आम्लपित्त की पोट फुगणे? गोंधळून जाऊ नका; या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात!
Bloating vs acidity difference : आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत पोटाच्या तक्रारी असणे आता सामान्य झाले आहे. पण, अनेकदा आपण 'पोट फुगणे' (Bloating) आणि 'आम्लपित्त' (Acidity) या दोन वेगवेगळ्या समस्यांना एकच समजण्याची चूक करतो. "काहीतरी जास्त खाल्ले असेल" किंवा "पित्त झाले असेल" असे म्हणून आपण एखादी गोळी घेतो आणि विषय सोडून देतो. परंतु, जर तुमचे शरीर वारंवार हे संकेत देत असेल, तर ही साधी समस्या नसून एखाद्या गंभीर आजाराची पूर्वसूचना असू शकते.

फरक समजून घेणे का महत्त्वाचे?
आम्लपित्त आणि पोट फुगणे या दोन्ही समस्या पचनसंस्थेशी संबंधित असल्या तरी त्यातील मूळ फरक समजणे उपचारांच्या दृष्टीने आवश्यक आहे.
आम्लपित्त (Acidity) : यात प्रामुख्याने छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे किंवा पोटाच्या वरच्या भागात दाह होणे अशी लक्षणे दिसतात. हे जठरातील आम्ल (Acid) वरच्या दिशेला सरकल्यामुळे होते.
पोट फुगणे (Bloating) : यात पोटात घट्टपणा जाणवतो. जेवणानंतर लगेच कपडे घट्ट वाटणे, पोटात गॅस धरणे किंवा थोड्याच घासानी पोट गच्च भरणे ही याची लक्षणे आहेत.
हे दोन्ही त्रास एकाच वेळी होऊ शकतात, ज्यामुळे रुग्ण अधिक गोंधळून जातो आणि चुकीचे उपचार घेतो.
पोट फुगण्याची छुपी कारणे
केवळ अतिजेवण हेच पोट फुगण्याचे कारण नसते. अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. सुरंजित चॅटर्जी यांच्या मते, वारंवार होणारे पोट फुगणे हे खालील समस्यांचे लक्षण असू शकते:
इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) : आतड्यांच्या संवेदनशीलतेमुळे होणारा त्रास.
हार्मोनल बदल : विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी किंवा पेरीमेनोपॉज दरम्यान शरीरात पाणी साठून राहिल्याने (Fluid Retention) पोट फुगते.
थायरॉईड समस्या : थायरॉईडची पातळी कमी झाल्यास (Hypothyroidism) आतड्यांची हालचाल मंदावते, परिणामी गॅस आणि बद्धकोष्ठता वाढते.
ताणतणाव : मानसिक ताण थेट आतड्यांतील बॅक्टेरिया आणि पचनक्रियेवर परिणाम करतो.
'रेड फ्लॅग्स': कधी सावध व्हावे?
सण-समारंभात किंवा उशिरा जेवल्यावर कधीतरी पोट फुगणे सामान्य आहे. मात्र, खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे:
- दीर्घकाळ त्रास : जर पोट फुगण्याचा त्रास सलग २-३ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल.
- वजन कमी होणे : विनाकारण वजन घटणे आणि सतत थकवा जाणवणे.
- बदललेली शौच विधी : सततची बद्धकोष्ठता किंवा वारंवार होणारा अतिसार.
- ताप आणि पोटदुखी : पोट फुगण्यासोबतच तीव्र वेदना किंवा ताप येणे.
- लवकर पोट भरणे : दोन-चार घास खाल्ल्यावरच पोट पूर्ण भरल्यासारखे वाटणे (Early Satiety).
(महत्त्वाची टीप : 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणारी पचनसंस्थेची लक्षणे ही 'क्रॉनिक' असू शकतात. अशा वेळी घरगुती उपायांपेक्षा वैद्यकीय तपासणीला प्राधान्य द्यावे.)
तपासणी आणि उपाय
सतत अँटासिड्स घेतल्याने तात्पुरता आराम मिळतो, पण मूळ आजार लपला जातो. योग्य निदानासाठी डॉक्टर साधारणपणे पुढील चाचण्या सुचवू शकतात.
- रक्त तपासणी : थायरॉईड आणि ॲनिमिया तपासण्यासाठी.
- स्टूल टेस्ट : संसर्ग किंवा पचनातील बिघाड तपासण्यासाठी.
- इमेजिंग किंवा एंडोस्कोपी : जर लक्षणे गंभीर असतील तर आतड्यांची अंतर्गत तपासणी करण्यासाठी.
प्रतिबंधात्मक पावले
तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी खालील बदल उपयुक्त ठरतील.
- आहार : आहारात फायबरचे प्रमाण वाढवा आणि पुरेसे पाणी प्या.
- नियमित व्यायाम : शारीरिक हालचालींमुळे आतड्यांची हालचाल सुधारते.
- ताण व्यवस्थापन : योगासने आणि पुरेशी झोप पचनासाठी वरदान ठरते.
- सवयी बदला : रात्री उशिरा जेवणे किंवा जेवणानंतर लगेच झोपणे टाळा.












Click it and Unblock the Notifications