'कांतारा' वादात रणवीर सिंहची हायकोर्टात धाव; FIR रद्द करण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
Ranveer Singh, Kantara Chapter 1 controversy : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंह सध्या एका कायदेशीर वादात अडकला आहे. 'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटासंदर्भात केलेल्या एका विधानावरून त्याच्याविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार आणि एफआयआर रद्द करण्यासाठी रणवीरने आता कर्नाटक उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

वादाचे मूळ: गोव्यातील तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
या वादाची ठिणगी गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (IFFI) मध्ये पडली होती. या कार्यक्रमात रणवीर सिंहने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपटातील अभिनयाचे भरभरून कौतुक केले होते. कौतुक करताना रणवीरने चित्रपटातील क्लायमॅक्स सीनची नक्कल केली आणि एका विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख केला.
वादग्रस्त ठरलेले विधान : रणवीरने म्हटले होते की, चित्रपटातील तो सीन थक्क करणारा होता जेव्हा "एक स्त्री आत्मा शरीरात प्रवेश करते." तक्रारदार वकील प्रशांत मेथल यांच्या मते, रणवीरने या विधानात देवी चामुंडीचा उल्लेख 'स्त्री भूत' असा केला, ज्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
कायदेशीर कारवाई आणि एफआयआर
तक्रारदार प्रशांत मेथल यांनी सुरुवातीला हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
खाजगी तक्रार : मेथल यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १९६, २९९ आणि ३०२ अंतर्गत खाजगी तक्रार दाखल केली.
न्यायालयाचा आदेश : २८ जानेवारी रोजी दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी रणवीर सिंह विरोधात एफआयआर नोंदवून त्याला दोन वेळा नोटिसा बजावल्या.
कर्नाटक उच्च न्यायालयात काय घडले?
रणवीर सिंहची कायदेशीर टीम सोमवारी न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर हजर झाली.
रणवीरची बाजू : वकिलांनी असा युक्तिवाद केला की, रणवीरचा उद्देश केवळ कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक करण्याचा होता. त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. पोलिसांनी नोटिसा पाठवल्या असल्याने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली.
न्यायालयाची टिप्पणी : न्यायालयाने सुरुवातीला तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "याचिकाकर्ता बॉलिवूड अभिनेता आहे म्हणून तातडीने सुनावणी घ्यायची का?" असा सवाल खंडपीठाने विचारला. मात्र, पोलिसांच्या नोटिसांचा विचार करून न्यायालयाने मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
रणवीर सिंहने मागितली माफी
विवाद वाढल्यानंतर रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्पष्टीकरण देत माफी मागितली होती. त्याने म्हटले होते.
"माझा उद्देश केवळ ऋषभ शेट्टीच्या उत्कृष्ट अभिनयाला अधोरेखित करण्याचा होता. मी नेहमीच आपल्या देशातील संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा मनापासून आदर केला आहे. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो."
काय सांगते कायदा?
तक्रारदाराने ज्या कलमांखाली तक्रार केली आहे, त्यानुसार धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे. आता कर्नाटक उच्च न्यायालय या प्रकरणात रणवीरला दिलासा देते की पोलिसांना तपास सुरू ठेवण्याचे आदेश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications