पतीला गमावल्यानंतर हेमामालिनींचे 'ते' वक्तव्य! 3 विशेषणं अशी वापरली ज्यातून धर्मेंद्र उलगडले..
Hema malini first statement after dharmendra death : बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि महान अभिनेते धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि कोट्यवधी चाहते शोकसागरात बुडाले आहेत. सुरुवातीला देओल कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसताना, आता धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी अखेर आपले मन मोकळे केले आहे. पतीला गमावल्याचे दुःख त्यांनी एका अत्यंत भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे, जो वाचून कोणाचेही डोळे पाणावतील.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी 'एक्स' हँडलवर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. हेमा मालिनी यांनी आपल्या भावनांना शब्द देताना लिहिले.. "धरम जी, ते माझ्यासाठी खूप काही होते. एक प्रिय पती, आमच्या मुली ईशा आणि अहाना यांचे प्रेमळ वडील, माझे मित्र आणि माझे मार्गदर्शक - खरं सांगायचं तर ते माझं संपूर्ण जग होते."
त्यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या साध्या आणि मनमिळाऊ स्वभावाने माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले होते. ते प्रत्येकाला प्रेम आणि आपलेपणा देत असत. हेमा मालिनी यांच्या या पोस्टमधून स्पष्ट होते की, धर्मेंद्र हे केवळ त्यांचे पती नव्हते, तर त्यांच्या आयुष्याचा मुख्य आधारस्तंभ होते.
प्रतिभा अन् अद्भुत नम्रता
धर्मेंद्र यांच्या सार्वजनिक जीवनातील लोकप्रियतेबद्दल बोलताना हेमा मालिनी लिहितात की, "एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून त्यांची लोकप्रियता, प्रतिभा आणि अद्भुत नम्रता यामुळे त्यांना एक अद्वितीय स्थान प्राप्त झाले होते. ते प्रत्येक दिग्गजापेक्षा वेगळे आणि खास होते. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आणि यश नेहमीच स्मरणात राहील."
पतीला गमावल्याचे दुःख शब्दांत न मांडता येणारे
हेमा मालिनी यांनी पतीला गमावल्याचे दुःख शब्दांत न मांडता येणारे असल्याचे सांगितले. "माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान खूप मोठे आहे, जे शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आयुष्यभर राहील." असे म्हटले आहे, यासह धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेले असंख्य सुंदर क्षण आणि त्यांच्या आठवणी त्यांना या कठीण काळात आधार देत राहतील, असेही त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications