अखेर शत्रुघ्न सिन्हांनी केलं मन मोकळं, सोनाक्षीच्या लग्नाबाबत म्हणाले...
मुंबई : सोनाक्षी सिन्हाचा विवाह सोहळा गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे. सोनाक्षीने 23 जूनला तिचा प्रियकर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ती सोशल मीडियातून सारखी ट्रोल होऊ लागली आहे. या प्रकारामुळे व्यथित झालेले तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते शुत्रुघ्न सिन्हा यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली.

एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाने आयुष्यात अनेक संकटे पाहिली आहेत. दोन भिन्न समाजातील विवाहाबाबत चिंता करण्यासारखे काही नव्हते. आम्ही दोन्ही कुटुंब इतर सामान्य कुटुंबासारखे आहोत. वेगवेगळ्या धर्मात असे लग्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
कुटुंबातील मतभेदाबाबत म्हणाले...
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा 23 जून रोजी नोंदणीकृत विवाह झाला. सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा हा विवाहसोहळ्याला उपस्थित नव्हता. याबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, कोणत्या कुटुंबात भांडणे किंवा मतभेद नाहीत? आम्ही काही मुद्द्यांवर असहमत असू शकतो. पण त्यामुळे कुटुंबात वाद नाहीत. इतरांसारखंच आमचंही कुटुंब आहे. आम्हाला कोणीही तोडू शकत नाही. माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले मी सहन करणार नाही.
सोनाक्षीच्या विवाहाबाबत स्पष्ट म्हणाले...
सोनाक्षीच्या लग्नाबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'वडील म्हणून मी माझ्या मुलीसाठी आनंदी आहे. तिच्या आयुष्याबाबतच्या तिने घेतलेल्या निर्णयांवर मी तिच्यासोबत आहे. त्यांचा आनंद हाच माझा आनंद आहे. त्यांना आनंदी पाहून मलाही आनंद होणार आहे. मला खात्री आहे की झहीर तिला आनंदी ठेवेल. आमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
सात वर्षांपासून होते रिलेशन
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षीही या दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. मात्र सोनाक्षीचे कुटुंबीय त्यांच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचे बोलले जात होते. पण अखेर 23 जून रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications