गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार केला जाणार? 'या' दिग्गज खेळाडूला मिळणार जबाबदारी!
Team India head coach Gautam Gambhir : क्रिकेट विश्वातून अतिशय महत्त्वाची व धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाची मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या गौतम गंभीर यांना हेड कोच पदावरुन हटवण्यात येणार आहे. कारण त्याने जेव्हापासून हेड कोचची जबाबदारी घेतली. तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
ज्यामध्ये काही निराशाजनक कामगिरी आणि रेकॉर्ड देखील मोडले गेले आहेत. रोहित शर्माच्या संघाने 27 वर्षांनंतर प्रथम श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली आणि त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व कारणांमुळे आता गौतम गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी राहिलेली नाही. घरच्या मैदानावरच किवीजविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे भारताला प्रथमच घरच्या मैदानावर मालिका क्लीन स्वीप करण्यास भाग पाडले. प्रत्येकाला गौतम गंभीरने टीम इंडियासोबत यशस्वी कारकिर्दीची अपेक्षा केली होती. परंतु, प्रत्यक्षात वेगळाच अनुभव पाहायला मिळत आहे. भारताचा माजी सलामीवीर आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी प्रचंड दबावाखाली असल्याचे देखील सांगितले जात आहे.
या सगळ्यामध्ये गंभीरला 'करो या मरो' च्या स्थितीचा सामना करावा लागत आहे, असा दावा जागरणच्या एका अहवालातून समोर आला आहे. जर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चांगली कामगिरी केली नाही. तर प्रशिक्षक पदावरुन गौतम गंभीरला पायउतार केले जाणार आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणला मिळू शकते संधी
व्हीव्हीएस लक्ष्मणला कसोटीची कमान मिळू शकते. जर भारताचा ऑस्ट्रेलियात चांगला निकाल न मिळाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना कसोटीची जबाबदारी स्वीकारण्यास सांगू शकतात, असाही दावा केला जात आहे.
व्हाईट बॉलचा कोच म्हणून गंभीरला जबाबदारी?
एका मीडिया रिपोर्टनुसार, गंभीरला पांढऱ्या चेंडूच्या संघांचे प्रशिक्षक बनण्यास सांगितले जाईल. बीसीसीआयने वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक ठेवण्याचा निर्णय घेतल्यास, भारत पहिल्यांदाच स्प्लिट कोचिंगची निवड करेल. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर ठेवून गंभीर असा बदल स्वीकारेल की नाही हे कळत नाही. रोहित आणि त्याचा संघ ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-0 किंवा 5-0 अशा फरकाने जिंकावी लागेल.
ऑस्ट्रेलियात किमान दोन सामने जिंकणे आवश्यक पुढील वर्षी लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियात किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. तथापि, दोन विजय भारतासाठी कशाचीही हमी देत नाहीत आणि त्यानंतर संघ त्याच्या बाजूने येणाऱ्या इतर निकालांवर अवलंबून असेल.
BCCI ने घेतली गंभीर-शर्माची बैठक
शुक्रवारी, BCCI ने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत न्यूझीलंडविरुद्ध 0-3 च्या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबाबत सहा तासांची बैठक घेतली. गंभीर आणि भारतीय थिंक टँकमध्ये काही निर्णयांबाबत मतभेद असल्याचे वृत्त आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टर्निंग ट्रॅक वापरण्याच्या बाबतीत मुख्य प्रशिक्षक आणि संघाचे इतर वरिष्ठ सदस्य एकमत नव्हते, असेही कळते. गौतम गंभीरने आधीच दोन मालिका गमावल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव शवपेटीतील शेवटचा खिळा ठरू शकतो. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.












Click it and Unblock the Notifications