जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंत देशमुखांना बेड्या; थोरांतांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्याबाहेरून वसंत देशमुखांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, जयश्री थोरात यांच्यासह खासदार भाऊसाहेब वाघचौरे मिळून 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमका वाद?
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. त्यानंतर संगमनेरमधील वातावरण चांगलेच तापले होते. दुसरीकडे सुजय विखे यांनी देखील आरोप करत मला संपवण्याचा काही लोकांचा डाव होता, असे म्हटले होते.

जयश्री थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल
वसंत देशमुखांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्येमोठा गदारोळ झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. आज जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
या प्रकरणावरुन माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राने देशमुखांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्यांच्यावर कारवाई न करता जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतं आहे. महाराष्ट्रातील जनता या कृत्याचा निषेध करतील. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचं आणि दुसरीकडे बहिणीचे हे हाल करायचे. मतांकरता हे काहीही करतात. महाराष्ट्रातील पाच वर्षात राजकरणाची पातळी बदलली होती. मात्र नुकत्याच झालेल्या घटनेने याचा तळ गाठलेला आहे. माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नाही. तर संपूर्ण महिला वर्गाला ही शिवी दिलेली आहे, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
अटकच नव्हे कडक कारवाई व्हावी
वसंत देशमुख यांना अटक केल्यानंतर जयश्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, अटक झाली असेल. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे. हा अपमान केवळ माझे एकटीचा नसून प्रत्येक महिलेचा आहे. ज्यांच्या सभेत ते बोलले त्या सभेच्या प्रमुखांनी देखील आता महिलांची जाहीर माफी मागितली पाहिजे. संगमनेरवासियांनी संयम ठेवला आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करते कुणीही कायदा हातात घेऊ नये. संगमनेर तालुक्यात ते दहशत घेऊन येत आहेत. इथे संधी नसल्याने त्यांना निवडणूक होऊ द्यायची नाही, असे म्हणत त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला.












Click it and Unblock the Notifications