अखेर महाविकास आघाडी फुटली; संजय राऊत यांनी केली स्वबळावर लढण्याची घोषणा
अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभेत एकत्र लढलेली महाविकास आघाडीत आता फूट पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही सबळावर लढणार आहोत, अशी घोषणा आज शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले, "मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल... आम्ही सबळावरच लढणार आहोत.
कार्यकर्त्यांसाठी स्वबळाचा नारा
संजय राऊत पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो. पण तेव्हा कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कार्यकर्त्यांना संधी मिळाली नसल्याने त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून प्रत्येकाने आपापले पक्ष मजबूत करावेत.", असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
मविआ फुटली?
शुक्रवारी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपास उशीर झाल्याने विधानसभेला पराभव झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संजय राऊत व अमोल कोल्हे या मविआतील घटकपक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. आता खा. संजय राऊत यांनी थेट स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications