Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाखा प्रमुखपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत एकनाथ शिंदेंनी प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले

Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणात वेळोवेळी स्वतःला सिद्ध करावे लागते. आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलावा लागतो. घराणेशाहीच्या जोखडात अडकलेल्या भारतीय राजकारणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी घराण्याबाहेरच्या लोकांना अभावानेच मिळते पण ज्यांना ती मिळते त्यातील खूप थोडे जण त्याचा सदुपयोग करू शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशा मोजक्या यशस्वी लोकांपैकी एक आहेत.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कौटुंबिक पाठबळ नाही, आर्थिक सुबत्ता नाही अशा परिस्थितीतही फक्त जनतेच्या जिव्हाळ्याची आंदोलने घेऊन एकनाथ शिंदे साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदे घेऊ शकले. शाखाप्रमुख, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री अशा प्रत्येक टप्प्यावर एकनाथ शिंदे आणि स्वतःला सिद्ध केले आहे. कौटुंबिक आपत्ती आली असतानाही मन खंबीर करून त्यांनी परिस्थितीचा मुकाबला केला. आणि आता मुख्यमंत्री म्हणून तसेच पक्षाचे मुख्य नेते म्हणूनही त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे. आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे निर्विवाद नेतृत्व आहे.

Shivsena Leader Eknath Shinde

एक एक माणूस जोडला

राजकारणात येण्याआधी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हे सर्वश्रुत आहे. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात त्यांची राजकीय वाटचाल झाली हे देखील महाराष्ट्राला ठाऊक आहे. आनंद दिघे असेपर्यंत एकनाथ शिंदे यांना आधार होता पण दिघे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना सांभाळणे आणि स्वतःलाही सिद्ध करणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी केली ती अप्रतिम म्हणावी अशी आहे. 2004 साली एकनाथ शिंदे आमदार झाले आणि 2014 पर्यंत ते साधे आमदार होते. पण या दहा वर्षाच्या काळातही त्यांनी पक्ष संघटनेतील एक एक माणूस स्वतःशी जोडून ठेवला. 2014 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उभारून त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता दाखवून दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सुरुंग

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. परस्पर मातोश्रीवरून निर्णय होऊ लागले. पक्षाच्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. हे हलाहल शिंदे यांनी संयमाने पचवले. 2022 पर्यंत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर निर्णायक घाव घालतील अशी कल्पनाही कुणाला आली नव्हती. 2022 जून महिन्यात झालेली विधान परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात एकनाथ शिंदे यांचा न घेतलेला सहभाग ही उंटाच्या पाठीवरची शेवटची गाडी ठरली आणि एकनाथ शिंदेंनी आपला अस्सल सातारी हिसका दाखवला.

एकनाथ शिंदे यांचे पक्षातील स्थान नेमके काय आहे याचा भल्याभल्यांना अंदाज आला नव्हता. बंडा नंतरचे चार दिवस तर माध्यमातले पंडित चाचपणीच करत होते. बंडाचा पहिला दिवस हा हिमनगाचे टोक ठरला. आणि बघता बघता उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले.

शिंदे यांचे शिवसेनेतील नेतृत्व सिद्ध

ठाणे हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे महानगरपालिकेतील अपवाद वगळता सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहिले. यातून ठाणे शहराचे आपण निर्विवाद नेते आहोत हे त्यांनी सिद्ध केले. ठाणे पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली यातून आपण कोकणाचे निर्विवाद नेते आहोत, हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले. आणि शिवसेनेचे 40 आमदार स्वतः सोबत आणून आणखी दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत आपण महाराष्ट्रातही निर्विवाद नेतृत्व करतो हेच शिंदे यांनी दाखवून दिले.

दमदार विरोधकांना सक्षम प्रतिकार

आमदारांची जोडतोड करून एखाद्या वेळेस मुख्यमंत्रीपद मिळवणे सोपेही असेल. पण खरी कसोटी लागते ती सभागृहात विरोधकांना तोंड देताना. चवताळलेली उद्धव ठाकरे यांची सेना, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे कसलेले विरोधक एकनाथ शिंदे यांनी लीलया शिंगावर घेतले. सभागृहात प्रभावी भाषणे करून विरोधकांना मुद्देसूद उत्तरे दिली.". विरोधकांना समाधानकारक उत्तरे देण्यास मी बांधील नाही" असे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते. पण एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहोत हे सभागृहात देखील सप्रमाण सिद्ध केले.

असंख्य योजनांचा पाउस

मुख्यमंत्र्याची प्रशासनावर मांड असावी लागते आणि मित्र पक्षांची समन्वय असावा लागतो. याबाबतीतही एकनाथ शिंदे सरस ठरले. थेट विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा असू देत किंवा विविध योजनांची अंमलबजावणी असू द्या किंवा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे कार्यान्वयन असू दे, एकनाथ शिंदे प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करत राहिले. लोककल्याणाच्या शेकडो योजना त्यांनी अमलात आणल्या. लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीचा मैलाचा दगड आहे. शिंदे यांच्या कारकिर्दीतच अटल सेतूचे लोकार्पण झाले, मुंबई मेट्रो तीन चा पहिला टप्पा सुरू झाला, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ला गती देण्यात आली, गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले, एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने महाराष्ट्राची गतिमान वाटचाल सुरू झाली, शेतकऱ्याला मोफत कृषी वीज दिली गेली.

मुत्साद्देगीरीतही सरस

राजकीय मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर देखील एकनाथ शिंदे सरस ठरले आहेत. लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षासाठी सन्मानजनक जागा आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या आहेत. आणि हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशीही तितकेच सलोख्याचे आणि धनिष्ठ संबंध ठेवले आहेत. उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशा नेत्यांच्या कुरबुरी समोर येत असल्या तरी शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या मतभेद झाल्याची अफवा सुद्धा पसरलेली नाही हे शिंदे यांच्याही समजूतदारपणाचे लक्षण आहे

संघटनेवर जबरदस्त पकड

आज महिला,युवा,मुली,ज्येष्ठ नागरिक,उद्योग,नोकरदार,खेळाडू,सरकारी कर्मचारी,दूध उत्पादक, पोलीस अशा सर्वच समाज घटकांसाठी उपयुक्त योजना एकाच वेळी अमलात आणणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राला ओळख आहे. राज्यात आज सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. थोड्याफार फरकाने प्रत्येक पक्षात आपल्या नेतृत्वाच्या विरोधात असलेल्या कुरबुरी चव्हाट्यावर मांडण्यात आल्या. पण एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप आजपर्यंत एकाही नेत्याने केलेला नाही. संघटनेवर जबरदस्त मांड असल्याचे हे निदर्शक आहे.

अनेक बाबतीत पहिले मुख्यमंत्री

महाराष्ट्राला आज पर्यंत जेवढे मुख्यमंत्री लाभले त्यातील बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक वारसा आहे. मनोहर जोशी, नारायण राणे, ए आर अंतुले हे केवळ अपवाद.या सर्वांच्या तोडीस तोड कामगिरी एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे. कोणत्याही आपत्तीत घटनास्थळी धावून जाणारा मुख्यमंत्री, कायम गर्दीच्या गराड्यात असलेला मुख्यमंत्री, रात्री तीन तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेट देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचा शेतीच्या बांधाशी थेट संबंध आहे असा पहिला भूमिपुत्र मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे.

चौफेर विचार करता, सर्व समाज घटक लक्षात घेता, आतापर्यंतचा महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास पाहता, आणि महाराष्ट्राचे सध्याचे राजकीय चित्र डोळ्याखालून घातले असता एकनाथ शिंदे हे निर्विवाद नेतृत्व आहे हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+