Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायी विचार, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील!
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 in Marathi : आज 19 फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. देशभरात आज मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जात आहे. आदर्श राजा, रयतेचा राजा, जाणता राजा अशी बिरुदावली आपण सर्वजण राजांच्या नावापुढे मोठ्या आदराने लावतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते.
दिल्लीच्या तख्यालाही त्यांनी दादरून सोडले होते. अशा आदर्श राजाने केवळ सत्ता मिळवले एवढेच काम केले नाही. तर अतिशय हालाखीच्या परिस्थितीत व मुस्लिम राजवटीच्या दहशतीखाली जीवन जगणाऱ्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून दिला. त्यांना त्यांचे राज्य दिले. स्वराज्य ही प्रेरणा दिली अन् त्याची स्थापना देखील केली. यामागे त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांची मोठी प्रेरणा होती.
आजही त्यांच्या जीवनातील गुण व त्यांचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे. शिवरायांचे संपूर्ण जीवनच आदर्श होते. त्यामुळे त्यांच्या जीवनामधून घेण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. त्यातील फक्त 10 प्रेरणादायी गोष्टींचा जर आपण प्रत्येकाने आपल्या दैनदिन जीवनात अंमलात जरी आणले तरी आपल्या सर्वांचे जीवन धन्य झाले, असे म्हणावे लागेल. चला तर जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील 10 प्रेरणादायी गुण..ज्यामुळे तुमचे जीवन बदलून टाकेल. तुम्हाला एक कर्तृत्ववान व्यक्ती बनवेल...!

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कुठे!
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते.
शिवजयंतीचे महत्त्व..!
छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषाला फक्त एक किंवा दोन दिवस शिवजयंती निमित्त मानवंदना देणं हे नक्कीच पुरेसं नाही. महाराजांचे कार्य इतके महान आहे की महाराष्ट्रातील प्रत्येकाने वर्षांचा प्रत्येक दिवस जरी शिवजयंती साजरी केली तरी ते कमीच पडावे. शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणाचा विचार केला, स्वराज्य निर्मितीसाठी आयुष्य वेचले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचे पालन केले, भवानी मातेची आराधना केली, महिलांना आदराचे स्थान दिले त्याचप्रमाणे प्रत्येकाने शिवरायांचे हे गुण स्वतःच्या अंगी भिनवणे म्हणजे शिवरायांना दिलेली खरी मानवंदना आहे.
शिवजयंती कशी साजरी करतात!
महात्मा ज्योतीबा फुले यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले आणि महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला आणि प्रदीर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहचावे यासाठी त्यांनी 1870 साली पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला. तेव्हा पासून महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होऊ लागली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही या दिवसाला एक महत्त्वाचे स्थान आहे. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले. ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षदेखील होते. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते.
शिवजंयती कशी साजरी करावी याबाबतही समाजात मतांतरे दिसून येतात. सध्यातरी सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराजांची गाणी ऐकणे, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, राजकीय पक्षांचे भव्य दिव्य कार्यक्रम, बाईक रॅली, सार्वजनिक ठिकाणी भव्य मिरवणूका काढून, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नाटके अथवा पथनाट्याचे आयोजन करून, राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन आणि त्रिवार मुजरा करून, भव्य दिव्य व्याख्यानमालांचे आयोजित करून अथवा रक्तदानासारखे सामाजिक कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो.

शिवरायांच्या जीवनातील 10 प्रेरणादायी गुण, जे तुम्हाला बनवतील उत्तम व सक्षम व्यक्ती...!
नेतृत्वगुण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्वगुण होता. त्यांच्या आईकडून त्यांनी नेतृत्वगुणाचे बाळकडू घेतले होते. प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी मोठ्या हिमतीने व नेतृत्वाने ती पुढे नेली. म्हणूनच त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले.
व्यवस्थापन
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. शिवरायांनी त्यांच्या जीवनातून ही शिकवण दिली आहे. कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मोहीम आखणे असो किंवा कोणतेही काम तडीस नेणे असो त्यांनी त्यामागे व्यवस्थापन केल्याचे आपण इतिहासात वाचतो.
आत्मविश्वास
आत्मविश्वास हा असा शब्द आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणा देणारा आहे. मित्र परिवाराला व सवंगड्यांना गोळा करून एक बारा तेरा वर्षातील युवक स्वराज्याची स्वप्न पाहू लागला. मुस्लिम राजवटीचा नायनाट करण्याचे ध्येय ठेवू लागला. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यात असलेला प्रचंड विश्वास. आत्मविश्वासाला त्यांनी गर्वाची झालर कधीच चिकटू दिली नाही. ही शिवकण आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे.
सांघिक काम
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात सांघिक कामाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. कोणतीही लढाईला जाण्याआधी त्यांनी कोणी कोणती बाजू सांभाळायची, कोणता सवंगडी किंवा साथी कशात पारंगत आहे, ते काम अतिशय सांघिक पद्धतीने करून घेतले. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सांघिक कामाला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय ते शक्य होणार नाही.
दूरदृष्टी
छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रचंड दूरदृष्टी होती. भविष्यात कसा लाभ होईल. प्रजेला काय मिळेल, जनता सुखी कशी होईल, याची दूरदृष्टी शिवरायांकडे होती. त्यांचा हा गुण आपल्या सर्वांना प्रेरणा देऊन जातो. प्रत्येक कामामध्ये दूरदृष्टी ठेवली तर काम किती चांगले व यशस्वी होऊ शकते, हे दिसून येते.
वेळेचे नियोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी देणारा गुण म्हणजे टाईम मॅनेजमेंट अर्थात मराठीत त्याला आपण वेळेचे नियोजन म्हणतो. कल करो सो आज कर, आज करे सो अभी अशी म्हण आहे. अगदी तसंच वेळेचे नियोजन करून वेळेतच काम पूर्ण करण्याचा शिवरायांच्या जीवनातील गुण सर्वांना आजही उपयुक्त ठरतो.
योग्य सहकाऱ्यांची निवड
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जे काही सवंगडी, सरदार, मित्र जोडले. त्यासाठी त्यांनी योग्य सहकाऱ्यांची निवड केली. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात देखील जे सहकारी त्यांनी निवडले. ते सर्वच एकापेक्षा एक चाणाक्ष होते. कोणतेही काम सिद्धीस पोहोचवत होते. हाच गुण आपल्या सर्वांना दैनदिन जीवनात प्रेरणादायी व उपयुक्त ठरतो.
दीर्घकालीन विचार
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतेही काम करण्याआधी, एकादी मोहीम हाती घेण्याआधी व लढाई वेळप्रसंगी जिंकणे असो की तह करणे असो, यामागील दीर्घकालीन काय होऊ शकते याचा विचार केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे दीर्घकालीन त्याचा परिणाम कसा होऊ शकतो. हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
शांततेने निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी त्याची मुहूर्तमेढ रोवताना अनेक गोष्टींचा विचार करून शांततेत निर्णय घेतल्याचे इतिहास व त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. शांततेने घेतलेल्या निर्णयाचे फळ गोडच मिळते, ही शिकवण आपल्या सर्वांना त्यांनी त्यांच्या जीवनातून दिलेली आहे.
छोटी सुरुवात
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. त्या कामाची सुरुवात ही छोट्या गोष्टीतून होत असते. त्यामुळे आयुष्यात छोटी सुरुवात प्रत्येकाने केली पाहिजे. एक मिशन म्हणून जगताना प्रत्येक कामाला महत्त्व दिले पाहिजे, अशी शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्या सर्वांना दिली आहे.












Click it and Unblock the Notifications