ठाण्याचा विकास आणि विकासाचे ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवनव्या प्रकल्पांची मांदियाळी
राज्यात महायुती आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात ठाणे आणि परिसराच्या विकासाकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प ठाणे शहर आणि जिल्हा परिसरात उभारले जात असून त्या माध्यमातून रोजगाराच्या आणि निवासाच्या मोठ्या संधी या भागात उपलब्ध होत आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रकल्पांना जातीनिशी लक्ष घालून त्यांनी गती दिली आहे.
पायाभूत सुविधांचा विकास हे युती सरकारच्या कारभाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सध्या कल्याण तळोजा मेट्रो 12 चे काम प्रगतीपथावर असून पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या मार्गावर 19 स्थानके येत असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला नवा पर्याय निर्माण होत आहे. 2026 पर्यंत ही मेट्रो नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऐरोली मुक्त मार्ग हा बारा किलोमीटर लांबीचा मार्ग नवी मुंबई ते काटई हे 45 मिनिटाचे अंतर दहा मिनिटात कापणार आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या आणि मुंबई नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची महापे, शिळफाटा मार्गवरच्या कोंडीतून मुक्तता होणार आहे. कल्याण- शिळफाटा हा 21 किलोमीटरचा सहा पदरी रस्ता देखील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीतील वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणार आहे. 997 मीटर लांबीचा पलावा उड्डाणपूल, 750 मीटर लांबीचा कल्याण फाटा उड्डाणपूल, 810 मीटर लांबीचा मुंब्रा उड्डाणपूल, 740 मीटर लांबीचा शिळफाटा सहा पदरी उड्डाणपूल हे देखील परिसरातील वाहतूक कोंडीला आळा घालणार आहेत.

कल्याण रिंग रोडचा तिसरा टप्पा प्रगतीपथावर
कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 2186 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेला हा रिंग रोड डोंबिवली आणि टिटवाळा या दोन शहरातील एक तासाचे अंतर 15 मिनिटांवर आणणार आहे. कल्याण, डोंबिवली, शहाड, अंबिवली आणि टिटवाळा या शहरातील वाहतुकीला रिंग रोड मुळे नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मोठा गाव मानकोली उड्डाणपूल हा सव्वा किलोमीटर लांबीचा पूल ठाणे आणि डोंबिवली हे अंतर 15 मिनिटांवर आणणार आहे.
अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांची उभारणी
तब्बल 204 कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांची उभारणी करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात सर्वच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. अंबरनाथ रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे त्यामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होत आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 32 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत तर डोंबिवली औद्योगिक वसाहतीत 31 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. कल्याण आणि डोंबिवली परिसरात विविध सांस्कृतिक भवन उभारण्यात आली आहेत. या दोन्ही शहरात क्रीडा संकुलांच्या उभारणीसाठी भरीव निधी देण्यात आला आहे आणि उद्यानांच्या उभारणीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे
पायाभूत सुविधांचे तब्बल ३४ प्रकल्प
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे पायाभूत सुविधांचे तब्बल 34 प्रकल्प आकार घेत असून ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मधील नवे मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यात नव्या मेट्रो लाईन पासून बुलेट ट्रेन पर्यंत आणि द्रुतगती महामार्गापासून उन्नत रस्ते आणि बोगद्यांचा समावेश आहे.
बोरीवली ठाणे भूमिगत मार्ग
8900 कोटी रुपये खर्च करून भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून बोरिवली आणि ठाणे हे दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. या मार्गामुळे 21 किलोमीटरचे हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे. ठाणे घोडबंदर रोड कॉरिडोर साठी 667 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आठ लेनचा ठाणे कोस्टल रोड प्रस्तावित असून तो वांद्रेशी जोडला जाणार आहे. 661 कोटी रुपये खर्चातून ठाणे मुंबई वॉटर वे चा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ठाणे, वसई, नवी मुंबई आणि मुंबई ही शहरे जोडली जाणार आहेत. वडाळा, कासारवडवली ते गायमुख ही मेट्रो चार आणि मेट्रो चार ए कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच मेट्रो 5 अंतर्गत ठाणे भिवंडी आणि कल्याण ही शहरे जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेत असून त्याचीही अंमलबजावणी प्रतीक्षेत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले आहे. ठाणे शहरातील रायलादेवी तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अखत्यारितील 27 गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
गेल्या दोन वर्षात ठाणे शहर आणि जिल्ह्यात विकास कामांचा धडाका लावून देण्यात आला असून एमएमआरडीए क्षेत्रात भविष्यातील ठाण्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असेल हे निश्चित झाले आहे. आगामी काळात येऊ घातलेले प्रकल्प देखील मध्यवर्ती शहर म्हणून ठाण्याचा विकास करणार आहेत.












Click it and Unblock the Notifications