मनोज जरांगेंच्या मराठा-दलित-मुस्लिम आघाडीचे उमेदवार 'या' दिवशी जाहीर होणार, पहा काय ठरले..
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर निवडणुकीत उरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की फक्त पाडायचे, या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दिलं. आंतरवाली सराटीत मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणी, आंबेडकरी चळवळीचे आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर या प्रमुख नेत्यांशी अडीच तास चर्चा करत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजवला. कोणत्या जागा लढायच्या याचा निर्णय येत्या ३ नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मराठा- दलित- मुस्लिम समाजाची मोट
या बैठकीत मराठा, दलित व मुस्लिम समाजाने (एमडीएम) एकत्र येऊन १४५ ते १५५ मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'दोन दिवसांत आणखी काही समाजाशी चर्चा करून ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची नावे जाहीर करू.' धर्मपरिवर्तनासाठी नाही तर सत्ता परिवर्तनासाठी आम्ही एकत्र आलो, असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

नेमकी कशी ठरली 'एमडीएम'ची रणनिती?
मराठा, दलित व मुस्लिम समाज एकत्र आल्याशिवाय सामान्यांपर्यंत सत्ता पोहोचणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. त्याला इतर दोन्ही समाजांचे नेते, धर्मगुरूंनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणी, आंबेडकरी चळवळीचे आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत आंतरवाली सराटीत गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात कोणत्या मतदारसंघात लढायचे हे ठरवण्यात आले. बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
नेमके काय ठरले बैठकीत?
पत्रकार परिषदेत राजरत्न आंबेडकर यांनीही आगामी रणनितीची माहिती दिली. ते म्हणाले, धनगर, ओबीसी, लिंगायत, बंजारा व इतर लहान समूहसुद्धा आमच्यासोबत येणार आहेत. त्यांनाही आम्ही सोबत घेऊ. आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही, तिसरी आझादी आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम जरांगे यांनी केले आहे. आमच्या बाजूने बोलणारे प्रतिनिधी आता विधानसभेत पाठवायचे आहेत, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर यांच्या जिल्हानिहाय सभा होतील, असे नियोजन करण्यात आले. तसेच तब्येतीच्या कारणामुळे धर्मगुरू नोमाणी हे मोजक्याच सभांना उपस्थित राहतील, असेही ठरले.
जरांगे म्हणजे नवे गांधीजी- नोमाणी
दोन दिवसांत म्हणजेच तीन नोव्हेंबरपर्यंत जरांगे पाटील उमेदवारांची घोषणा करतील, त्यानंतर ५ नोव्हेंबरपर्यंत किमान समान कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. राज्यात दलित-मुस्लिम-मराठा पॅटर्न यशस्वी झाला तर देशातही अशाच पद्धतीची मोट बांधता येईल का, यावर चर्चा झाली. निवडणुकीनंतर ते ठरविले जाणार आहे. मुस्लिम धर्मगुरू नोमाणी म्हणाले, 'संघाने धर्माच्या नावावर देशात भांडणे लावली. देशात फूट पाडणारे लोकच सत्तेत आहेत. मात्र जरांगे यांच्या रूपाने भारताला नवे गांधीजी, आंबेडकर मिळाले आहेत.












Click it and Unblock the Notifications