शिवसेनेत प्रस्थापितांना पुन्हा संधी ; नव्या चेहऱ्यांचाही समावेश
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुका जाहीर होताच महायुती, महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांची आघाडी यांनीही आपापसातील जागा वाटपाला अंतिम स्वरूप दिले असून भाजप आणि शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांना भेट एबी फॉर्म दिले आहेत. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या विद्यमान उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्राच्या राजकारणात यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची यादी विशेष महत्त्वपूर्ण आहे. कारण 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे अखंड शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे नेते होते. पण 2022 मध्ये शिवसेनेतून निवडून आलेल्या आमदारांनी उद्धव यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांनाच नेतृत्व दिले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली जादू आणि कमाल दाखवून दिली. मुख्यमंत्रीपद देखील एकनाथ शिंदे यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळले. विधानसभा निवडणुका जाहीर होताच जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी आणि आयाराम गयाराम राजकारणाला वेग आलेला असताना अपवाद वगळता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही पदाधिकारी अन्यत्र गेलेला नाही, ही बाब विशेष महत्त्वपूर्ण आहे. आणि एकनाथ शिंदे यांची आपल्या पक्षावर किती जबरदस्त पकड आहे हे सिद्ध करणारी देखील आहे.
सर्वच आमदारांना पुन्हा संधी
"माझ्यासोबत आलेल्या एकाही आमदाराचे नुकसान होणार नाही आणि एकही आमदार पडणार नाही, निवडणुका जिंकण्याचे तंत्र मला चांगलेच अवगत आहे", अशी भीम गर्जना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्या भाषणात केली होती. त्यानंतर काही दिवसातच शिवसेनेचे तेरा खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले. विधानसभेच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात काही विद्यमान खासदारांची तिकिटे एकनाथ शिंदे यांना कापावी लागली. पण त्या उमेदवारांना विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुनर्वसन केले. तर आपल्या सोबत आलेल्या सर्वच आमदारांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली आहे.
राजापूरमधून किरण सामंत यांना संधी
अर्थात काही ठिकाणी नवे चेहरे देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे दिसून येते. यातील सर्वात महत्त्वाचा चेहरा आहे तो किरण सामंत यांचा. किरण सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू. ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेला. भाजपमधून लढण्याचीही तयारी किरण सामंत यांनी दर्शवली होती. किरण सामंत यांचे फलक संपूर्ण लोकसभा मतदारसंघात लागले होते. मात्र लोकसभा उमेदवारीची माळ भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात घातली आणि किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे किरण सामंत नाराज असल्याची चर्चा संपूर्ण कोकणात होती.
या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी दोन्ही बंधूंचे समाधान केले आहे. किरण सामंत यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याशी होणार आहे. राजन साळवी हे राजापूर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण किरण सामंत यांनीही गेल्या काही दिवसापासून राजापूर मतदारसंघात चांगलीच मशागत केली असून त्यांची कन्या अपूर्वा सामंत घरोघरी आपल्या पित्याचा प्रचार करते आहे. राजापूर मतदारसंघात कांटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.
एरंडोलमधून अमोल पाटील यांना संधी
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघात चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार होते. मात्र त्यांच्या जागी त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या यादीतील हे एक नवे नाव आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा चमत्कार करून दाखवणारे राज्याचे माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास संदिपान भुमरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या यादीतील हे देखील एक नवे नाव आहे.
खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नीला संधी
मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र काही काळानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अवघ्या 48 मतांनी उद्धव गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. ही प्रचंड चुरशीची निवडणूक होती.
रवींद्र वायकर प्रतिनिधित्व करीत असलेल्या जोगेश्वरी पूर्ण मतदार संघातून वायकर यांच्या पत्नी मनीषा वाईकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे देखील शिवसेनेच्या यादीतील महत्त्वाचे नाव आहे. त्याशिवाय खानापूर आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर या शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. दुर्दैवाने अलीकडेच त्यांचे निधन झाले. "अनिल बाबर यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या पित्याची उणीव भासू देणार नाही" असा शब्द एकनाथ शिंदे आणि दिला होता. विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पूर्ण केला आहे.
निलेश राणे यांना कुडाळमधून उमेदवारी शक्य
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश होत आहे. बुधवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांची उमेदवारी घोषित केली जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निलेश राणे हे देखील शिवसेनेच्या यादीतील महत्त्वाचे नाव असणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान चेहऱ्यांना संधी देतानाच नवे चेहरे देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications