शिवसेना नेते दीपक केसरकर सावंतवाडी मतदार संघातून चौथ्या विजयासाठी सज्ज
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेच्या प्रवासात अनेक माणसे संघटनेत सहभागी झाली. आपल्या कर्तृत्वाने आणि कर्तबगारीने त्यांनी संघटनेचा विस्तार केलाच, शिवाय संघटनेच्या विरोधकांनाही चांगलाच शह दिला. शिवसेनेला तळकोकणात मिळालेला असाच एक हिरा म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
सावंतवाडी शहरातील एका घरंदाज श्रीमंत कुटुंबात दीपक केसरकर यांचा जन्म झाला.. नगरसेवक, नगराध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे. एक सुस्वाभावी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी सावंतवाडी शहर आणि परिसरात स्वतःचा नावलौकिक केला. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढले आणि विजयी झाले. तो काळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या वर्चस्वाचा काळ होता. नंतर केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात भूमिका घेतली.

तळकोकणाच्या राजकारणासाठी हा मोठा धक्का होता.कारण राणेंच्या साम्राज्याला निर्णायक तडाखा देऊ शकेल, अशी भूमिका तेव्हापर्यंत कोणी घेतली नव्हती. केसरकर यांनी ती घेतली.आणि शिवसेनेच्या संघटनेची त्यांना साथ मिळत गेली. केसरकर यांचा राणेंना असलेला विरोध शमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले.. अगदी शरद पवार, जितेंद्र आव्हाड, अजित पवार यांच्यासारखे नेते देखील तळ कोकणात उतरले होते. पण केसरकर नमले नाहीत. आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दिला शब्द खरा केला
नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांची आणि केसरकर यांची खडाजंगी झाली होती. " आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्या खुर्चीवर एक दिवस मी बसलेला असेन" असे विधान केसरकर यांनी भर बैठकीत केले आणि ते बैठकीतून उठून निघून गेले होते. केसरकर यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील केसरकर यांच्याकडे चालून आले. अर्थराज्यमंत्री म्हणून त्यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प देखील सादर केला.
पुन्हा विधानसभेत
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला. मात्र महाविकास आघाडीच्या राजकारणात मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकली नाही. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उलटफेर केला. शिंदे आणि ठाकरे यांच्यात सलोखा घडवून आणण्याचे प्रयत्न केसरकर यांनी केले. पण तो योग काही जुळून आला नाही आणि अखेर स्वतः केसरकर एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले. संयत स्वभाव,अभ्यासू वृत्ती,माध्यमांना संसदीय भाषेत आणि शांतपणे उत्तर देण्याचा खाक्या यामुळे शिंदे यांनी प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करून टाकली. ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित सांभाळली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रीपदी आणि मुंबई शहरच्या पालकमंत्री पदी केसरकर यांची नियुक्ती शिंदे यांनी केली.
मोती तलावाचे सौंदर्यीकरण
सौंदर्यदृष्टी हा केसरकर यांचा अनुकरणीय गुण आहे. सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेल्या मोती तलावाचे ज्या पद्धतीने सुशोभीकरण आणि विकास त्यांनी केला आहे तो पाहण्यासारखा आहे. मोती तलाव हे फक्त सावंतवाडी वासियांसाठी नाही तर विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र आहे. वेंगुर्ले बंदर आणि नवाबागचा किनारा यांना जोडणारा झुलता पूल देखील केसरकर यांनी आपल्या मतदारसंघाला दिलेली मोठी देणगी आहे. हजारो पर्यटक दररोज झुरत्या पुलावर येऊन वेंगुर्ले शहरातील मनोहरी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतात. या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना रोजगाराची उपलब्ध झाली आहे.
आडाळी एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी या गावी एमआयडीसी झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीत आपले प्रकल्प उभारण्यासाठी आवाहन केले.या एमआयडीसीच्या माध्यमातून किमान 500 रोजगारांची निर्मिती व्हावी यासाठी केसरकर यांनी नुकतीच काही कंपन्यांची देखील बैठक घेतली आहे.
सावंतवाडी, दोडामार्गमध्ये क्रीडासंकुल
सावंतवाडी शहराला आणि परिसराला मोठी क्रीडा संस्कृती आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा क्रीडा प्रकारात शहरातील क्रीडापटू आपले कौशल्य दाखवत असतात. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यातून सावंतवाडी येथे देखणे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे तसेच दोडामार्ग येथेही क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील क्रीडापटूंना हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. केसरकर यांच्या प्रयत्नातूनच वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प येत आहे. आपल्या मतदारसंघाच्या पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी केसरकर सातत्याने प्रयत्नशील असतात. सावंतवाडी शहरात त्यांनी उभारलेले शिल्प ग्राम आकर्षणाचे केंद्र आहेत.
चौथ्या विजयासाठी सज्ज
कोणतीही वादग्रस्त पार्श्वभूमी नसल्यामुळे तसेच समोरच्या व्यक्तीला सन्मानाची वागणूक मिळत असल्यामुळे केसरकर यांच्या बद्दल मतदारसंघात आदराची भावना आहे. शांत आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत केसरकर यांनी कधीही कोणालाही अपशब्द उच्चारलेला नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल एक निर्मळ भावना जनतेच्या मनात पाहायला मिळते. जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत केसरकर यांनी राणे यांच्याशी चांगले जुळवून घेतले आहे.
नारायण राणे यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल करताना तसेच राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश यांचे विधानसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना केसरकर सोबत उपस्थित होते. केसरकर सावंतवाडीतून निवडून आलेच पाहिजेत,असे आदेशच राणे यांनी आपल्या समर्थकांना दिले आहेत. केसरकर यांची वैयक्तिक प्रतिमा, त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांची मिळालेली जोड यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर हेच मैदान मारतील असा कोकणातील राजकीय पंडितांचा अंदाज आहे












Click it and Unblock the Notifications