राजापूरसाठी आशेचा 'किरण', राजन साळवी यांच्याशी भिडणार किरण भैय्या सामंत
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 साठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने किरण सामंत यांना उमेदवारी दिली आहे. किरण सामंत हे महाराष्ट्राला उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू म्हणून ज्ञात असले तरी तेवढीच त्यांची ओळख नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरण भैया अशी त्यांची स्वतंत्र ओळख आहे. धडाडीने काम करणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात ओळखले जाते.
किरण सामंत हे उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत.वडील रवींद्र सामंत यांचा बांधकाम व्यवसाय त्यांनी वाढवला. 2004 साली उदय सामंत आमदार म्हणून निवडून आले.त्यावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून किरण सामंत यांनी पडद्याआडून खूप काम केले. प्रचंड मोठा जनसंपर्क आणि कामाचा उरक ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

उदय सामंत यांचा व्याप राज्यभर वाढला तरी रत्नागिरीचा त्यांचा बालेकिल्ला किरण सामंत यांनीच भक्कम ठेवला. जनतेची कामे करण्यासाठी भैय्या सामंत यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आग्रही होते. परंतु हा मतदारसंघ भाजपने मागून घेतला आणि नारायण राणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. त्यामुळे किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली. आणि आता त्यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात येत आहे .
राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला.
राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा राजापूरचे आमदार गणपत कदम राणे यांच्यासोबत होते. पोटनिवडणुकीत देखील गणपत कदम यांनी विजय मिळवला. पण 2009 पासून सातत्याने या मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी निवडून येत आहेत. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर रत्नागिरीचे उदय सामंत आणि खेड दापोलीचे योगेश कदम शिंदे यांच्यासोबत गेले तर राजापूरचे राजन साळवी आणि गुहागरचे भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणे पसंत केले. आता राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी विरुद्ध किरण सामंत अशी लढत होत आहे.
किरण सामंत यांची कोकणात बांधणी
किरण सामंत रत्नागिरीचे असले तरी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण कोकणात बांधणी केली होती. विशेषतः राजापूर विधानसभा मतदारसंघाकडे त्यांचे अधिक लक्ष होते. त्यांच्या कन्या अपूर्वा सामंत यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. उदय सामंत यांना मानणारा, किरण सामंत यांच्या शब्दाबाहेर नसलेला आणि राजन साळवी यांना कंटाळलेला मोठा मतदार वर्ग राजापूर विधानसभा मतदारसंघात आहे. शिवाय या मतदारसंघात भाजपची ताकद देखील लक्षणीय आहे त्यामुळे किरण सामंत यांचा राजकारणातील हा प्रवेश यशस्वी होईल असा विश्वास किरण सामंत यांच्या समर्थकांना वाटत आहे.
वाटुळ येथे होतय मल्टी स्पेशालिटी रुग्णालय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राजापूर विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. वाटुळ येथे मल्टी स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. तसेच किनारपट्टीवरील जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन देखील उदय सामंत यांच्या हस्ते आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. 22 कोटी रुपये खर्च करून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम करण्यात येत आहे.
साखरीनाटे जेटी भूमिपूजन
मासेमारी हा राजापूर तालुक्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. साखरीनाटे जेटी भूमिपूजन देखील उदय सामंत यांच्याच उपस्थितीत करण्यात आले. 153 कोटी रुपये खर्च करून ही जेटी उभारण्यात येत आहे. सिंधू रत्न कमिटीचे सदस्य आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत देखील यावेळी उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील मालपे जेटीपेक्षा साखरी नाटे येथील जेटी अधिक सुंदर असेल असा विश्वास उदय सामंत यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे. किरण सामंत यांच्या प्रयत्नातून राजापूर मधील किल्ले संवर्धनासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रस्त्यांसाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री रस्ते योजनेच्या अंतर्गत राजापूर तालुक्यात 50 किलोमीटरचे रस्ते होऊ घातले आहेत.
राजापूरचा पाणीप्रश्न मिटणार
अर्जुना नदी राजापूर मधून वाहत असली तरी एप्रिल आणि मे महिन्यात राजापूर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. पाणीटंचाईची ही समस्या निकाली काढण्यासाठी राजापूर येथे साहेबा धरण मंजूर करण्यात आले आहे. आठ कोटी रुपये खर्च करून त्याची पूर्तता करण्यात येणार आहे. यासाठी किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पाठपुरावा केला आहे. 28 मीटर उंच आणि दोन हजार मीटर लांब असलेला हा बंधारा पाणी साठवणूक सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
निधीच्या निधीच्या कमतरतेमुळे हे काम यापूर्वी थांबवण्यात आले होते मात्र उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्याच्या अर्थचक्राला गती मिळणार असून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे तसेच पर्यटकांना आकर्षित करून घेणारे हे एक प्रमुख केंद्र ठरणार आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांची दावेदारी भक्कम आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी या मतदारसंघात मोठा जनसंपर्क उभा केला आहे. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना देखील किरण सामान वेळोवेळी पाठबळ देत आले आहेत. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा किरण सामंत यांच्या रूपाने फडकेल असा विश्वास स्थानिक शिवसैनिकांतून व्यक्त केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications