मुख्यमंत्री व्हायचंय का..? मनोज जरांगे यांनी अगदी मनातलं सांगितलं, म्हणाले...
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते. त्याच दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा मनोज जरांगे असतील, असं आंबेडकरांनी सांगितलं होतं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. काल मनोज जरांगे यांना या चर्चेबाबत विचारण्यात आलं. तुम्ही तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहात का, असा प्रश्न विचारल्यावर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मला समाजाला मोठं करायचंय
मनोज जरांगे म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना असते. राजरत्न आंबेडकर साहेबांचीही भावना आहे. मी मुख्यमंत्री व्हावं, असं अनेकजण म्हणत आहे. पण माझं क्लिअर आहे. मला समाजाला मोठं करायचंय. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आलेत, असं म्हणत जरांगे यांनी या प्रश्नाला बगल दिली. मात्र फडणवीसांवरचा राग जरांगे यांनी पुन्हा व्यक्त केला. भाजपमधील मराठा आमदारांना उद्देशून जरांगे म्हणाले, तुम्ही तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आमच्या मागण्या मान्य करायला... निवडणूक लागण्याअगोदर आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर, फडणवीसांच्या आयुष्यातील ती सगळ्यात मोठी चूक असेल, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.

एकच लक्ष, दसरा मेळावा
जरांगे यांनी आगामी दसरा मेळाव्याबाबतही वक्तव्य केलं. ते म्हणाले, हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे. सगळे एकत्र या. कोणीही आडवं पडू नका. राज्यातील मराठ्यांची दसरा मेळावा घेण्याची इच्छा आहे. या मेळाव्या येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालयं उघडी ठेवा. अजून माझी तब्बेत ठीक नाही, पण दसरा मेळाव्यासाठीच मी हाँस्पीटलमधून सुट्टी घेतली आहे. या मेळाव्याला सगळ्यांनी एकी दाखवावी, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.
मराठा आमदारांना केलं आवाहन
जरांगे पाटील म्हणाले, भाजपमधील मराठ्यांचे आमदार, खासदार, मंत्री यांना मी आवाहन करतो की, ज्या मागण्या आहेत त्या द्या. जर देवेंद्र फडणवीसांनी आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांच्या बाजून उभं रहायचं. पण जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असेल, असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications