भारीच की..! शहरातील मतांची टक्केवारी वाढणार; निवडणूक आयोगाने घेतलाय 'हा' निर्णय
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर आदी शहरी भागात लोकसभेला कमी मतदान झाले होते. विधानसभेलाही असेच होऊ नये व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने काही पावले उचलली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात त्यांनी शहरातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, याची सविस्तर माहिती दिली.
आता शनिवार-रविवार ऐवजी बुधवारी मतदान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवाय राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. यापूर्वीचे मतदान हे रविवारी किंवा शनिवारी होत होते. मात्र सलगच्या सुट्यांमुळे शहरातील चाकरमानी हे बाहेर फिरायला जातात व मतदानाकडे पाठ फिरवतात, असे निरीक्षण काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मांडले होते. लागून सुटी आल्याने शहरातील मतदार हे बाहेर जातात, असा अनुभव होता. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत यावेळी शनिवार-रविवारऐवजी बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

यावेळी या सुविधाही मिळणार
शहरातील किंवा खेड्यातील 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्या लोकांकडून फार्म 12 भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे निवडणूक आयोगाची टीम जाणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी सर्व उमेदवारांना रूट चार्ट देण्यात येणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे शहरातील ज्येष्ठांना आता घरबसल्या मतदान करता येणार आहे.
मुंबई, ठाण्यात मतदारांमध्ये निरुत्साह असतो. झोपडपट्टी भागांमध्ये मतदानासाठी रांगा लागतात. पण उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय परिसरातील मतदान केंद्रे दुपारनंतर ओस पडलेली असतात. मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून अनेक प्रयत्न झाले, पण शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह कमी होत नाही. सुट्टीच्या काळात मुंबई, ठाण्यातील मतदार हे बाहेरगावी किंवा गावाला जातात. याचा मतदानावर परिणाम होतो. त्यामुळे यावेळी महापालिका आयुक्तांना हाताशी धरून काही ठोस उपाययोजना व आठवड्याच्या मध्यावर मतदान घेण्याचा प्रयोग राबवला जाणार आहे. यामुळे शहरात मतांची टक्केवारी वाढेल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications