Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकरी कुटुंबात जन्म, व्यवस्थेला जाब विचारणारा निडर तरुण, ध्येयवादी नेता बच्चू कडू, वाचा संघर्षगाथा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राला जशी शांत, संयमी लोकप्रतिनिधींची परंपरा लाभली आहे तशीच आक्रमक आणि जनतेसाठी व्यवस्थेला थेट भिडणाऱ्या प्रतिनिधींचीही परंपरा लाभली आहे. या परंपरेतील एक नाव सध्या जास्त चर्चेत आहे ते म्हणजे आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू.

सामान्य कुटुंबातून आलेला तरुण ते व्यवस्थेशी संघर्ष करणारा, व्यवस्थेला जाब विचारणारा आणि थेट आणि समोरासमोर भिडणारा, स्पष्ट भूमिका घेणारे व्यक्तीमत्व आहे. बच्चू कडू हे भूमिकेशी अजिबात तडजोड न करणारे व्यक्तिमत्व आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि त्याएवढेच त्यांनी समाजभान जपत समाजसेवा केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Bachu Kadu s Background

शेतकरी कुटुंबात जन्म

अमरावती जिल्ह्यातील नांदूर बाजार या खेडेवजा शहरात एक शेतकरी कुटुंबात बच्चू कडू यांचा जन्म झाला. घरातूनच मिळालेले समाजसेवेचे बाळकडू घेऊन बच्चू कडू महाविद्यालयात गेले आणि तिथे त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक जिंकली. त्यांच्या डोक्याला लागलेला तो पहिला गुलाल. सामान्य जनतेची कामे करीत करीत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती अशी पदे भूषवली. आणि लोकहिताची कामे करून त्या पदांचा मान देखील वाढवला. संघर्ष हा बच्चू कडू यांचा स्थायीभाव आहे. गोरगरिबांची कामे झालीच पाहिजेत त्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी राबलेच पाहिजे, त्यात कोणतीही कसर ठेवता कामा नये आणि कोणती कसर राहत असल्यास थेट जाब विचारला जाईल असा दराराच बच्चू कडू यांनी तयार केला.

Maharashtra Assembly Election 2024 Bachu Kadu s Background

शिवसेनेतून सुरुवात

व्यवस्थेशी संघर्ष करणारा प्रत्येक तरुण हा आधी शिवसेनेच्या संपर्कात येतो. बच्चू कडूही आले. पण स्थानिक नेत्यांशी त्यांचे सूर जुळले नाहीत आणि त्यांनी प्रहार जनशक्ती संघटनेची स्थापना केली. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी या लढाऊ तरुणाला विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागला. पण अमरावती जिल्ह्यात एका वादळाचा जन्म झाला आहे याची नांदी 1999 साली झाली. आणि 2004 साली आपली लोकप्रियता, लोकांची केलेली कामे, अफाट जनसंपर्क यांच्या जोरावर बच्चू कडू यांनी विधानसभेत प्रवेश केला.

सत्तेत असो की नसो संघर्ष सुरुच

2004, 2009, 2014, आणि 2019 अशा सलग चार निवडणुका कोणत्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता बच्चू कडू अचलपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सत्तेत असले म्हणून त्यांचा संघर्ष कधीही कमी झाला नाही उलट सत्तेतले बच्चू कडू आणखी बंडखोर दिसतात. अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचे टोकाचे खटके उडाले आहेत. महाराष्ट्रातल्या शहरी भागातील माध्यमांनी बच्चू कडूंच्या या आक्रमकतेची खिल्ली उडवली, त्यावर टीका केली पण गडी हटला नाही. सुस्त पडलेल्या व्यवस्थेशी त्यांचा संघर्ष सत्तेत नसतानाही सुरू होता आणि सत्तेत असतानाही तो तितक्याच आक्रमकपणे सुरू आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Bachu Kadu s Background

टाकीवर चढून आंदोलन, शेतकऱ्यांचा बनला आवाज

शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय. सुमारे 70 टक्के जनता शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. त्यातही पश्चिम विदर्भातील शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात होतात. शेतकऱ्यांचा आवाज बनून विधिमंडळात गर्जना करणारा पश्चिम विदर्भातील पहिला नेता म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिले जाते. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी " आमदाराची राहुटी" हा अभिनव उपक्रम घेऊन तालुका पातळीवरील 47 विभागांच्या योजना राबवण्यासाठी पंधरा दिवसात अख्खा तालुका पालथा घातला आणि लोकांची कामे करून दिली.

2019 साली आपल्या पक्षातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांचे अनेकदा खटके उडाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी टाकीवर चढून केलेले आंदोलन आणि तत्कालीन मंत्र्यांनी टाकीवर चढूनच त्यांच्याशी साधलेला संवाद हा चर्चेचा विषय ठरला.

स्वतःला झाडाला टांगून, जमीनीत गाडून आंदोलन

अभिनव आणि लक्ष वेधून घेणारी आंदोलने हे बच्चू कडू यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेण्याचे आंदोलन, सरकारी कार्यालयात गणपती बसवण्याचे आंदोलन, आदिवासींचे वनपट्टे मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडो आंदोलन, जनतेला भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खुर्ची लिलाव आंदोलन, रुग्णालयातील गैरसोयींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी झाडाला उलटे टांगून घेऊन केलेले आंदोलन, शेतकऱ्यांच्या कापसाच्या बिलासाठी सामूहिक मुंडन आंदोलन, दारूबंदीसाठी दारू दुकानांसमोर दूध वाटप आंदोलन अशी असंख्य आंदोलने त्यांनी केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला.

Maharashtra Assembly Election 2024 Bachu Kadu s Background

बच्चू कडू दिव्यांगांचे कैवारी

बच्चू कडूंना "दिव्यांगाचे कैवारी" म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपली प्रहार संघटना दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभी केली. रुग्णसेवा हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात. स्वतः त्यांनी रक्तदानाचे शतक पार केले आहे. मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी मुंबईच्या मनोरा या आमदार निवासात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

..तेव्हा परिणामांची पर्वा केली नाही

व्यवस्थेला थेट भिडणारा आमदार म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे. त्यासाठी ते कधीही परिणामांची पर्वा करत नाहीत. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य जनतेला दाद देत नसतील, कामचुकारपणा करत असतील तर प्रसंगी कठोर होत बच्चूभाऊंनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्टाईलने धडा शिकवला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलने केली, यात बच्चूभाऊंना अटक पण झाली, पण बच्चूभाऊ आपल्या भूमिकेपासून मागे फिरले नाहीत.

भूमिकेवर नेहमीच ठाम

बच्चू कडू यांची राजकीय भूमिका ही थेट आणि स्पष्ट असते. त्यात ते कसलीही तडजोड करीत नाहीत. सुरुवातीला शिवसेनेत असलेल्या बच्चू कडू यांनी काही कारणामुळे शिवसेना सोडली आणि स्वतःची संघटना स्थापन केली. त्या माध्यमातून यश मिळवले. 2019 साली महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. प्रत्येक आमदाराभोवती सुरक्षारक्षकांचे कडे लावण्यात आले. पण सोबतीला कोणीही न घेऊन एकट्या फिरणारा अपक्ष आमदार बच्चू कडू होते.

मुख्यमंत्री पदासाठी बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आणि त्या भूमिकेवर ते ठाम राहिले. उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते. पण दिव्यांग बांधवांना स्वतंत्र मंत्रालय मिळावं यासाठी त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदावर देखील लाथ मारली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले.

बच्चू कडूंनी निर्माण केला रक्तदानाचा आदर्श

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा, दिव्यांग व्यक्तींसाठी रस्त्यावर उतरणारा, व्यसनमुक्तीसाठी रस्त्यावर उतरणारा, स्वतः रक्तदान करून रक्तदानाचा आदर्श निर्माण करणारा, ग्रामीण भागातला हा अस्सल आणि सच्चा नेता आहे. जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे. कुठलाही सरंजामी वारसा नसताना फक्त जनतेच्या प्रेमावर बच्चू कडू यांची वाटचाल झालेली आहे. आमदार आणि मंत्री असूनही पदाचा, सत्तेचा माज चढून देणारा हा एकमेव नेता असावा. आजही हाताच्या बाह्या सरसावून कबड्डी खेळणारा आणि बैलगाडी शर्यतीत स्वतः बैल हाकणारा आमदार महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. ते एकमेव बच्चू कडू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+