विकासकामांच्या जोरावर किणीकर चौथ्यांदा पोहोचतील विधानसभेत; पहा अंबरनाथची गणिते
Maharashtra Assembly Election 2024 : अनुसूचित जाती करिता राखीव असलेल्या अंबरनाथ मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदार होण्याच्या प्रयत्नात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान आमदार किणीकर यांनी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे हे उमेदवारी करत आहेत.
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली या मतदारसंघात किणीकर विरुद्ध वानखेडे अशी लढत झाली होती. त्यावेळी किणीकर यांनी वानखेडे यांचा तीन हजार मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी महायुतीची एकसंघ ताकद बघता किणीकर यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला
हा मतदारसंघ 1978 साली अस्तित्वात आला. पहिल्या निवडणूकीत जनता पार्टीचे उमेदवार येथून निवडून आले. त्यानंतरच्या काळात या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र नव्वदच्या दशकात शिवसेनेच्या झंझावातात हा मतदारसंघ ही शिवसेनेने जिंकला. शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांनी 1990, 1995, 1999 असा सलग तीन वेळा अंबरनाथमधून विजय मिळवला होता. त्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसन कथारे यांनी साबीर शेख यांचा काही हजारांच्या मतांनी पराभव केला आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. त्यानंतर आजपर्यंत मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे.

खा. शिंदे यांचे विशेष लक्ष
हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचेही या मतदारसंघात विशेष लक्ष आहे. त्यामुळे यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर हे येथून चौथ्यांदा विजय मिळवतील अशी शक्यता वाढली आहे. शिवाय या मतदारसंघात भाजपचीही ताकद चांगली आहे. शिवाय शिवसेनेअंतर्गत वाद शमविण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात किणीकर यांचे यांचे वजन वाढले आहे.
अंबरनाथमध्ये महायुतीची विकासकामे
गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात महायुती सरकारने कोट्यवधींची विकासकामे केली.शिवाय काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने बदलापूर व अंबरनाथ शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. यातील अंबरनाथ योजना पूर्णत्वाकडे आहे. उल्हास नदीतून अतिरिक्त सात दशलक्ष घनमिटर पाणी मिळाल्याने अंबरनाथ तालुक्याची तहान भागली आहे. याशिवाय सामान्यांच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्यावर्षी अंबरनाथ येथे सरकारी मेडिकल कॉलेजालाही सरकारने परवानगी दिली होती. याशिवाय अंबरनाथ रेल्वे स्थानकसाठीही सुमारे 82 कोटींचा निधी दिला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी गेल्यावर्षी 14 कोटींची निधी आ. किणीकरांच्या पुढाकाराने मंजूर झाला होता. त्यापूर्वी अंबरनाथ येथील शिवमंदीरासाठीही 43 कोटींचा निधी मिळालेला आहे.
वाहतूक कोंडीही महायुतीनेच सोडली
अंबरनाथ शहरातील वाहतूककोंडीचे व्यवस्थापन करण्यासाठी सॅटिस प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून येथे बहुमजली वाहनतळ इमारती उभ्या राहिल्या आहेत. एमएमआरडीएच्या बैठकीत वाहनतळ आणि सॅटिस प्रकल्पासाठी 81 कोटी 53 लाख रुपयांच्या निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला. या प्रकल्पामुळे अंबरनाथ स्थानक परिसरातील रोजच्या कोंडीतून अंबरनाथकरांची सुटका झाली आहे. हा प्रकल्प येणाऱ्या निवडणुकीत किणीकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications