2024 मधील भारताची ती काळरात्र! देशाने अनमोल हिरा गमावला, रतन टाटांच्या निधनाने देश हळहळला!
Lookback 2024, Ratan Tata Death : रतन टाटा, एक असे नाव ज्यांनी अनेक नवतरुणांना उद्योजक होण्यास प्रेरणा दिली, ज्यांनी कित्येक तरुणांच्या बिझनेस कल्पनांना आर्थिक बळ दिले. देशाच्या विकासासाठी व देश प्रथम ही भावना ज्यांनी आयुष्यभर पाळून काम केले. असे देशाचे अनमोल रत्न अर्थात रतन टाटा यांचे वर्ष 2024 मध्ये 9 10 ऑक्टोबरला निधन झालं अन् संपूर्ण देश हळहळला. उद्योगविश्व पोरका झाला अन् भारताने ती काळरात्र अनुभवली. जेव्हा उद्योगातील वटवृक्ष विसावला होता.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांनी आयुष्यभर उद्योगाबरोबरच नेशन फर्स्ट असा विचार करून काम केलं. अनेक सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन त्यांनी देशाला त्यांनी एक परिपाठ दिला.
खरंतर रतन टाटा यांनी नेहमीच आपल्या बिझनेसबरोबर देशाचा सुद्धा विचार केला आहे. त्यामुळेच रतन टाटांचे नाव अनेक पुरस्कारांवर सुद्धा कोरले गेले आहे. मागील वर्षी म्हणजेच 2023 साली, महाराष्ट्र सरकारचा पहिला 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा याना देण्यात आला होता. अशा या थोर व्यक्तीच्या जाण्याने खरच देश पोरका झाला आहे. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील उणीव कधीही भरून निघणारी नाही. चला प्रकाश टाकूया त्यांच्या जीवन कार्यावर व त्यांच्या योगदानावर...!

रतन टाटा 1990 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष
28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. ते 1990 ते 2012 पर्यंत समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. रतन टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख होते.
रतन यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. एअर इंडियाचा त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. परदेशी कंपनी फोर्डने लँड्रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.
रतन टाटा यांना पद्मविभूषणने सन्मान
त्यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक महत्त्वाची कामगिरी केली. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आणि जेआरडी टाटा यांच्यानंतर 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. त्यांच्या कार्यमग्न स्वभावामुळे टाटा समूहाचे नाव देशात मोठ्या सन्मानाने घेतले जाते. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रात देखील त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
रतन टाटा यांचा जीवनप्रवास
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली.
1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.
टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिली आणि सायरस मेस्त्रींकडे पदभार दिला.
मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.
परोपकारी प्रयत्न आणि सामाजिक योगदान
त्यांच्या व्यावसायिक यशापलीकडे, रतन टाटा त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी ओळखले जातात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांना चालना देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग नियंत्रित करणाऱ्या टाटा ट्रस्टने भारतातील लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक सामाजिक कारणांमध्ये योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी व प्रगती केली आहे. टाटांनी या क्षेत्रात महत्त्वाच्या क्षेत्रात योगदान दिले...!
ऑटो क्षेत्र : रतन टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने वाहन उद्योगात एक मोठी क्रांती घडवली होती. त्यांनी 2008 मध्ये जगातील सर्वात स्वस्त कार, टाटा नॅनो, बाजारात आणली होती. ही कार सामान्य कुटुंबासाठी एक आदर्श उदाहरण बनली आणि भारतीय ऑटो क्षेत्रात क्रांती केली. याशिवाय, टाटा मोटर्सने जगभरातील अनेक देशांमध्ये आपला ठसा उमठविला आहे.
शिक्षण व आरोग्य सेवा : शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्येही रतन टाटांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन दिले. तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांसारख्या संस्थांनी अनेकांना ज्ञान आणि आरोग्यसेवा प्रदान केली आहे.
सामाजिक कार्य : रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा ट्रस्टने अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले, ज्यामध्ये गरीब आणि वंचित लोकांसाठी आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा समावेश आहे. टाटा ट्रस्टने ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, व इत्यादी आवश्यक उपक्रम राबवले आहेत. ज्यामुळे आज भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे.
देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता: जेव्हा कुठल्या देशाची कंपनी आंतराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करते, तेव्हा कंपनीबरोबरच त्या देशाचे सुद्धा नाव उंचावले जाते. रतन टाटांनी जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमठवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे टाटा समूहाची जागतिक बाजारात चांगली ओळख निर्माण झाली आहे.
देशातील कोट्यवधी लोकांना रतन टाटा यांचे कार्य आणि विचारधारा आजही प्रेरणा देत आहेत आणि पुढेही देत राहील. भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या महान उद्योजकास खऱ्या अर्थाने मानाचा मुजराच.












Click it and Unblock the Notifications