वैभव नाईकांची हॅट्रिक हुकणार..? कुडाळमध्ये निलेश राणेंनी समिकरणे बदलवली
Kudal Assembly Election 2024, Nilesh Rane Vs Vaibhav Naik : कुडाळ मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला. वैभव नाईक हे २०१४ आणि २०१९ असे सलग दोनदा येथील आमदार आहेत. मात्र यावेळी मालवण आणि कुडाळ या दोन्ही तालुक्यात झंझावाती प्रचार करत, शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी या मतदारसंघातील वातावरण फिरवल्याचे चित्र दिसत आहे. वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे यांनी जोर लावल्यानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला यावेळी हातून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवाय नाईक यांना शिवसेनेच्या फुटीचा फटका बसणार असल्याचेही बोलले जात आहे.
शिवसेना फुटीचा नाईकांना फटका
वैभव नाईक हे या मतदारसंघात यापूर्वी दोनदा आमदार राहिले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी नारायण राणे यांचा सुमारे दहा हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी राणे समर्थक अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांचा सात हजार मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी २०२४ ची निवडणूक नाईक यांच्यासाठी सोप्पी नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मालवण व कुडाळ या दोन्ही तालुक्यातील शिवसैनिकातही विभागणी झाली. शिवाय यावेळी निलेश राणे हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहे. मात्र भाजपची संपूर्ण ताकदही त्यांच्या मागे आहे.

लोकसभेला राणेंना मिळाले मताधिक्य
भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २६ हजार २३६ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यंदा वैभव नाईक यांच्यासमोर महायुतीचे आव्हान आहे. निलेश राणे यांनी भाजपाकडे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली. आता शिंदेसेनेची ताकद व भाजपची ताकद अशी दुहेरी ताकद राणे यांच्या पाठीशी असणार आहे.
राणेना ३५ वर्षांचा अनुभव
राणे कुटुंब हे गेल्या ३५ वर्षांपासून राजकारण व समाजकारणात आहे. मालवण तालुक्याशी १९९० पासून राणे कुटुंब जोडलेले आहे. त्यामुळे ही लढत राणे कुटुंबासाठी सोप्पी असल्याचे बोलले जाते. येथून दोन वेळा वैभव नाईक जिंकले असले तरी, लोकसभेला याच तालुक्याने राणेंना २६ हजारांचे लीड दिले. राणेंना मानणारे कार्यकर्ते व नेते या तालुक्यात असल्याने राणेंना ही निवडणूक अवघड जाणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजप व शिंदेसेनेच्या जोरावर येथून सध्यातरी निलेश राणेंचे पारडे जड दिसत आहे.
मतदारसंघात टाँप फाईव्हची चर्चा
या मतदारसंघाला विकासाच्या स्पर्धेत महाराष्ट्रात टाँप फाईव्हमध्ये नेणार असल्याचे सांगत निलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवाय नाईक यांनी २०१४ मध्ये नारायण राणेंचा केलेला पराभवाची सलही राणे कुटुंबाच्या मनात आहे. हे सगळं पाहता राणेंनी कुडाळ मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याबरोबरच नाराजांची यशस्वी मदत घेण्यावरही राणे कुटुंबाचा जोर आहे. दोन्ही तालुक्यात भाजप व शिंदे गटाची यंत्रणा कार्यरत झाल्याने या मतदारसंघाचा पेपर वैभव नाईकांसाठी अवघड जाणार असल्याची चर्चाही होताना दिसत आहे.
निलेश राणेंची पोस्ट चर्चेत
आ. वैभव नाईक हे आपल्या कार्यकर्त्यांना व उद्योजक-व्यावसायिकांना धमकावत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. तुम्ही फक्त २० तारखेपर्यंत हा त्रास सहन करा, नंतर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही.. असे राणे यांनी पोस्टमध्ये लिहले होते. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आ. नाईक हे कार्यकर्ते व व्यावसायिकांना फोन करुन धमक्या देत आहेत. मला भेटून जा म्हणत आहेत, असा आरोप राणेंनी केला होता. दहशतीतून मुक्त व्हायचं असेल तर २० तारखेपर्यंत थांबा,अशा आशयाची राणेंची पोस्ट सध्या दोन्ही तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नियोजनबद्ध प्रचार, महायुतीचा एकसंघपणा, युवकांचं मायक्रोप्लॅनिंग या जोरावर निलेश राणे यांचंच पारडं येथे जड असल्याचे दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications