सरपंचाच्या हत्येनंतर ग्रामस्थांच्या आंदोलनाला हिंसक वळण, बस पेटविली; मनोज जरांगे पोहोचले घटनास्थळी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना सोमवारी घडली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत.

नेमकं काय घडलं?
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख (वय 45) व त्यांचा भाऊ धारूरवरुन केजच्या दिशेने सोमवारी जात होते. त्यावेळी अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
तीन आरोपींनी अटक
संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी केल्याची फिर्याद केज पोलीस ठाण्यात दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्यातील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 वर्षे रा. मैंदवाडी ता.धारुर) यांना ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ग्रामस्थांचा आंदोलनला हिंसक वळण
या प्रकरणानंतर मस्साजोग ग्रामस्थांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सकाळी 9 वाजेपासून बीड-लातूर महामार्ग रोखून धरण्यात आला. आंदोलक ग्रामस्थांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती आहे. केजमध्ये पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले आहेत. या रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी एक एसटी बस पेटवली आहे. आरोपींना पोलीस पकडत नाहीत, योग्य कारवाई करत नाहीत, न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
खा. सोनवणे, जरांगेंची भेट
एनसीपी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घटनेचा निषेध केला. या प्रकरणात आपण एसपींना अनेकदा फोन केला होता, परंतू त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप सोनावणेंनी केला. यामागे राजकीय व्यक्तीचा हात दिसून येत आहे. पोलिसांनी चौकशी करून तत्काळ आरोपींवर कारवाई करायला हवी यासाठी हा मुद्दा उद्या संसदेत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही मस्साजोग या गावाकडे निघाले असून ते पिडीत कुटुंबियांची भेट घेणार आहेत.












Click it and Unblock the Notifications