छत्रपती शिवाजी महाराजांवर राहुल सोलापूरकरांचे वादग्रस्त विधान, NCP नेते म्हणाले- हा टकलू 'हैवान'...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकरने वादग्रस्त विधान केलेले राज्यात राजकारण तापलं आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी 'शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली, याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विविध संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
राहुल सोलापुरकर नेमकं काय म्हणाले?
अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी अलीकडे एक यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत.
शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो.", असे राहुल सोलापुरकर यांनी मुलाखतीत म्हटले होते. परंतु, अभिनेत्याच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.

अमोल मिटकरींनी घेतला समाचार
अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूरकर यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु "हैवान" असल्याच सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
जाणीवपूर्वक इतिहास बदल्याचा डाव, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल, असे अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?, हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा: सचिन खरात
राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवते. पण आता भाजपा सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आली आणि राहुल सोलापूरकर यांचे डोकं फिरलंय. त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे, असे सचिन खरात म्हणाले.












Click it and Unblock the Notifications