बदनापूर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नारायण कुचेंसमोर MVA चे आव्हान! यंदा हॅट्ट्रिक होणार की हुकणार?
Badnapur Assembly Constituency : बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात येतो. भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे या मतदारसंघातून तयारी करीत आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बदनापूर तालुका, भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजूर ही महसूल मंडळे आणि अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, धनगर पिंपरी, अंबड ही महसूल मंडळे आणि अंबड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. त्यावेळी भाजपचे नारायण कुचे विजयी झाले. पुढे 2019 च्या निवडणुकीत युतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. नारायण कुचे यांनी दुसर्यांदा विजय मिळवला. आता आमदार कुचे पुन्हा निवडणुकीची तयारी करीत आहेत. महायुतीकडून तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे.

महाविकास आघाडीकडून कोण?
माजी आमदार संतोष सांबरे हे शिवसेना ठाकरे गटात तर बबलू चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. शिवसेना फुटीनंतर सांबरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तर राष्ट्रवादी फुटीनंतर चौधरी यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवली. आता हे दोघेही महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. पण, हा मतदारसंघ कुणाला सुटणार हे अद्याप निश्चित नाही.
या आहेत समस्या?
बदनापूर तालुक्यातीची निर्मिती 1992 मध्ये झाली. पण, छत्रपती संभाजीनगर शहर जवळ असल्याने आजही बहुतांश शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. ते छत्रपती संभाजीनगरातून ये-जा करतात. रावसाहेब दानवे आणि कुचे यांनी अनेक कामे मार्गी लावली. पण, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी या समस्या कायम आहेत. बदनापूर तालुक्याचे शहर असूनही भकास आहे. अंबड तालुक्यातील काही गावांमध्येही याच समस्या आहेत.
गतवेळी काय झाले होते?
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला. आता कुचे हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना या विधानसभा मतदारसंघात तब्बल 13 हजार 742 लीड मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.

मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हे सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर या मतदारसंघांतील निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदार संघाच्या जातीय समीकरणाचा विचार केला तर दलित आणि मराठा यांची मत निर्णयाक ठरणार आहेत. पण, लढतीचे खरे चित्र जागा वाटपानंतरच कळणार आहे.












Click it and Unblock the Notifications