बच्चू कडू का हवेत? स्वतंत्र विचाराचा, आक्रमक, जनसेवेची कळकळ असलेला जनतेसाठी लढा देणारा नेता
Bachchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत परंपरा आहे. अनेक धुरंधर नेत्यांनी महाराष्ट्रात राजकारण केले, सत्ताही उपभोगली; पण या राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी स्वतःच्याच मुलाबाळांना आणि नातेवाईकांना आपले उत्तराधिकारी बनवणे अधिक पसंत केले. आपल्या मुलांना संधी मिळावी म्हणून पुतण्यांना सुद्धा संधी डावलल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या 64 वर्षांच्या इतिहासात शेकडो राजकारण्यांनी आपली मुले आणि नातवंडे राजकारणात स्थिरस्थावर केली.
महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून खासदार आहेत, त्यांचे नातू रोहित पवार नगर जिल्ह्यातून आमदार आहेत. तर युगेंद्र पवार यांनी बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ते अशोक चव्हाण- श्रीजया चव्हाण, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते अमित देशमुख आणि धीरज देशमुख, विठ्ठलराव विखे पाटील ते बाळासाहेब विखे पाटील आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील अन् सुजय विखे पाटील असे कौटुंबिक राजकीय वारसा असलेले नेत्यांनाच राजकीय संधी मिळत गेल्या. यासह विजयसिंह मोहिते पाटील ते रणजीतसिंह मोहिते पाटील अन् धैर्यशील मोहिते पाटील असा वारसा आणि त्यांच्याच कुटुंबात राजकीय संधी मिळत गेल्या. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ते संतोष दानवे अन् मुलगी संजना जाधव असा राजकीय वारसा पुढे नेला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच पतंगराव कदम ते विश्वजीत कदम असा राजकीय वारसा सर्वश्रृत आहे. यासह वसंतदादा पाटील- प्रकाश बापू पाटील- प्रतीक पाटील- विशाल पाटील अशी घराणेशाही असो की, पद्मसिंह पाटील यांच्यानंतर राणा जगजीत सिंह पाटील यांना मिळालेली संधी असो राजकीय वारसा पक्षही जपत आले आहेत.
अनिल देशमुख ते सलील देशमुख असो की, गोपीनाथ मुंडे- पंकजा मुंडे- प्रीतम मुंडे आणि प्रमोद महाजन पूनम महाजन यांना संधी मिळत गेली तर कोकणातही नारायण राणे ते निलेश राणे -नितेश राणे असा राजकीय वारसा आपल्याला लक्षात येतो. सुशीलकुमार शिंदे ते प्रणिती शिंदे आणि उदय सामंत किरण सामंत तसेच राज ठाकरे ते अमित ठाकरे अशी वारशाच्या राजकारणाची यादी प्रचंड मोठी आहे. स्वतःच्या कर्तबगारीवर लोकांमध्ये राहून लोकांसाठी लढून लोकप्रतिनिधी झालेले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक मावळत्या विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे होय.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांना कोणताही राजकीय वारसा नाही. ते श्रीमंत कुटुंबातून किंवा राजकीय घराण्यातून आलेले नाहीत. स्वतःच्या कर्तबगारीवर आणि अफाट जनकार्यावर तसेच गोरगरिबांचे प्रश्न मांडून त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे.
शेतकरी कुटुंबात जन्म
एका शेतकरी कुटुंबात बच्चू कडू यांचा जन्म झाला. घरातूनच मिळालेले समाजसेवेचे बाळकडू घेऊन बच्चू कडू महाविद्यालयात गेले आणि तिथे त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक जिंकली. सामान्य जनतेची कामे करीत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती अशी पदे भूषवली. लोकहितांची कामे करून त्या पदांचा मान देखील त्यांनी वाढविला. गोरगरिबांची कामे व्हायलाच हवी, यासाठी अधिकाऱ्यांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी जागरुक असायला हवे, त्यात कोणतीही कसर ठेवता कामा नये आणि कोणती कसर राहत असल्यास थेट जाब विचारला जाईल असा दंडकच बच्चू कडू यांनी घालून दिला.
चारवेळा आमदार
2004, 2009, 2014, आणि 2019 अशा सलग चार निवडणुका जिंकून कोणत्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता बच्चू कडू हे अचलपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सत्तेत असले म्हणून त्यांचा संघर्ष कधीही कमी झाला नाही, उलट सत्तेतील बच्चू कडू आणखी बंडखोर असतात. चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याचे त्यांचे तत्व आहे. शेतकऱ्यांचा आवाज बनून विधिमंडळात गर्जना करणारे पश्चिम विदर्भातील पहिले नेते म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिले जाते. 2019 साली आपल्या पक्षातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांचे अनेकदा खटके उडाले. लोकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवालाही बच्चू कडू यांनी योग्य अद्दल घडवली. त्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले पण बच्चू कडू डगमगले नाहीत आणि त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली नाही.
स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयासाठी लढा
अभिनव आणि लक्ष वेधून घेणारी आंदोलने हे बच्चू कडू यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. लोकहितासाठी असंख्य आंदोलने त्यांनी केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला. बच्चू कडूंना "अपंगांचे कैवारी" म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपली प्रहार संघटना अपंग बांधवांच्या पाठीशी उभी केली. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात.
दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण उद्धव ठाकरे यांनी त्या मागणीला न्याय दिला नव्हता. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे यांना साथ दिली. बच्चू कडू यांची मागणी शिंदे यांनीही मान्य केली आणि दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
बच्चू कडू ही सभागृहाची गरज
बच्चू कडू यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे अन्य आमदार क्वचितच असतील. तळागाळातून आल्यामुळे शेवटच्या घटकाच्या समस्यांची बच्चू कडू यांना जाण आहे. अनेकदा चांगल्या नेत्यांना पक्षीय बंधनांमुळे पक्षाच्या चुकीच्या भूमिकेचेही समर्थन करावे लागते. बच्चू कडू यांना तसे कोणतेही बंधन नाही. बच्चू कडू हे स्वतंत्र आहेत त्यामुळेच त्यांना योग्य वाटेल ती भूमिका ते घेऊ शकतात आणि आजपर्यंत त्यांनी ती तशी घेतली आहे. हे स्वातंत्र्य फार थोड्या लोकप्रतिनिधींना मिळते. बच्चू कडू यांचे व्यक्तिगत हितसंबंध कोणत्याही प्रकारचे नाहीत.
प्रहार संघटना वगळता स्वतःच्या व्यावसायिक आस्थापना किंवा कंपन्या बच्चू कडू यांनी उभारलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारी धोरण आपल्या हिताच्या दृष्टीने करून घेण्याची त्यांना आवश्यकता नाही म्हणूनच असा स्वतंत्र विचाराचा, आक्रमक, कळकळ असलेला आमदार सभागृहात असणे ही काळाची गरज आहे. अन्यथा घराणेशाहीतून आलेले नेते स्वतःची घराणी वाढवत बसतील, स्थिरस्थावर करीत राहतील, कारखाने उभारत राहतील आणि गोरगरिबांचा आवाज उठवणारा सभागृहात कोणीही राहणार नाही.












Click it and Unblock the Notifications