अजितदादांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा..? छातीठोकपणे म्हणाले- पुन्हा महायुती अन् मला मोठं पद
राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचे अजित पवारांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे नमूद केले. आज बारामती तालुक्यातील सुमारे ५९ गावांत अजितदादांनी दौरा केला. त्यावेळी महायुतीच सरकार येणार, येणार, येणार असं म्हणत त्यांनी आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार, असं त्रिवार सांगत छातीठोकपणे प्रचार केला. दादांच्या या वक्तव्याची आज महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली.
अजितदादांचा मूड बदलला...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेतील पराभव विसरून नव्या दमाने सुरुवात केली आहे. आज त्यांनी बारामती तालुक्यातील 59 गावांचा दौरा केला. झारगडवाडी येथील सभेतील त्यांचे भाषण चांगलेच गाजले. महायुतीचं सरकार येण्याचा मानस त्यांनी त्रिवार व्यक्त केला. काही झालं तरी महायुतीचे सरकार येणार.. येणार..! आणि आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार...! असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

भावनिकतेच्या मुद्यावर पुन्हा काढला चिमटा!
अजितदादा म्हणाले, 'लोकसभेला जे झालं ते झालं..! तो तुमचा अधिकार होता. त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र, विधानसभेला सर्वांनी एकत्र येऊन मला निवडून द्या. पुढचं सरकार महायुतीच असेल..! आणि त्या सरकारमध्ये मला महत्त्वाचं खातं असेल, अशी ग्वाही देतो. येणाऱ्या काळात याहीपेक्षा जास्त निधी कसा येईल त्यासाठी मी प्रयत्न करीन. तसेच तुम्हाला कोणीही प्रचाराच्या निमित्ताने येऊन भावनिक करेल. त्याला बळी न पडता. मला साथ द्या', असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पवार कुटुंबातच होणार बारामतीच लढाई
बारामतीची विधानसभेची लढाई ही लोकसभेप्रमाणे पवार कुटुंबातच होणार आहे. दोन्ही राष्टवादींने बारामतीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज निवडणूक म्हणून बारामतीच्या लढतीकडे पाहिले जात आहे. एकीकडे लोकसभेसह विधानसभेच्या अनेक निवडणुका लढवून विजय संपादन केलेले अजित पवार यांच्याविरोधात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणारे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात बारामतीची लढत होणार आहे.












Click it and Unblock the Notifications