1 मे : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे इतिहास माहित आहेत का? दोन्ही दिवस एकाच दिवशी कसे? वाचा
महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन हे दोन्ही दिवस 1 मे रोजी साजरा केले जातात. या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास वेगळा आहे. हे दोन्ही दिवस एकाच दिवशी येणे हा निव्वळ योगायोग आहे. त्यामुळे या दोन्ही दिवसांचा इतिहास काय? हे दिवस का साजरे केले जातात? तेच आपण पाहूयात...

कामगार दिनाचा इतिहास काय?
1 मे हा दिवस संपूर्ण जगात कामगार दिन म्हणून साजरा होतो. त्याचा इतिहास 19 व्या शतकापासून सुरु होते. त्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगार त्यांच्या अधिकारांसाठी एकवटले. 1 मे 1886 रोजी दिवसाचे आठ तास काम या मागणीसाठी शिकागोत आंदोलन झाले. श्रमिक रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाल्यावर या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. परिणामी पोलीस अधिकारी आणि आंदोलक दोघेही जखमी झाले. कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या आंदोलनानं जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली.
कसा सुरु झाला कामगार दिन?
1889 मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांशी एकता प्रदर्शित करण्यासाठी 1 मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित केला. तेव्हापासून मे दिवस हा कामगार चळवळीतील यश साजरे करण्याचा आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन करणारा दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो.
महाारष्ट्र दिनाचा इतिहास काय?
स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतरही अनेक दिवस मुंबई प्रांत होता. त्यात गुजरात व महाराष्ट्र ही आत्ताची दोन्ही राज्ये होती. त्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वतःच वेगळं राज्य असावं असं वाटत होतं. मराठी भाषिकही महाराष्ट्र राज्याची निर्मितीची मागणी करत होते. या काळात मुंबईतील काही गुजरात धार्जिण्या नेत्यांनी मुंबई शहर गुजरात राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मितीची मागणी जोर धरु लागली. त्यावेळी मराठी भाषा बोलणारे लोक गुजरातमधील डांग आणि उंबरगाव भागातही होते. ते कर्नाटकाच्या सीमेवरही होते. त्यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीनं उचल खाल्ली आणि संयुक्त महाराष्ट्राचा एक मोठा लढा उभा राहिला.
महाराष्ट्र दिनास सुरुवात
त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र कऱण्यासाठी जोरदार आंदोलन सुरु झाले. मुंबई राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिले. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या या सत्याग्रहीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार सुरू केला. मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा चिखल झाला. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या या लढ्यात 1957 पर्यंत 106 आंदोलकांना आपल्या जीवाचं बलीदान द्याव लागलं. अखेर या आंदोलनाला यश आलं. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तरी संयुक्त महाराष्ट्र होण्याचं स्वप्न काही प्रमाणात अपुरचं राहिलं. बेळगाव, कारवार, निपाणी, हुबळी, धारवाड, बिदर भालकी हा कर्नाकातील मराठी भाषिक भूभाग अद्यापही महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही. त्याच दिवसापासून एक मेला महाराष्ट्रदिन साजरा होऊ लागला.












Click it and Unblock the Notifications