तेल-गॅसनंतर आता जगाचा 'डेटा' धोक्यात! इराण इंटरनेट कापणार? भारताच्या 'या' क्षेत्रांना बसू शकतो फटका!
US iran war impact internet shutdown threat : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून, त्याचे परिणाम केवळ रणांगणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'मधून होणारी इंधन पुरवठा साखळी रोखल्यानंतर आता जगासमोर 'डिजिटल ब्लॅकआउट' चे मोठे संकट उभे ठाकले आहे.
समुद्रतळाशी असलेल्या ज्या इंटरनेट केबल्सद्वारे जगाचा संपर्क टिकून आहे, त्या आता युद्धाच्या निशाण्यावर आहेत. जर या केबल्सना धक्का लागला, तर भारतासह संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क काही क्षणात ठप्प होऊ शकतो.

समुद्राखालील 'फायबर-ऑप्टिक' जाळे धोक्यात
जगातील ९९% इंटरनेट ट्रॅफिक हे उपग्रहाद्वारे नव्हे, तर समुद्राखाली बिछवलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारे चालते. लाल समुद्र (Red Sea) आणि 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज' हे दोन असे मार्ग आहेत जिथून आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडणारे महत्त्वाचे केबल्स जातात.
लाल समुद्राखालील जाळे: येथून १७ मोठे सबमरीन केबल्स जातात.
हॉर्मुजमधील केबल्स: AAE-1, FALCON आणि टाटा-TGN गल्फ सारख्या केबल्समुळे भारताची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी टिकून आहे.
इराण आणि हूती विद्रोही काय करू शकतात?
इराणने हॉर्मुजच्या आखातात 'सी-माईन्स' (सागरी सुरुंग) बिछवल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, इराणकडे पाण्याखालील विशेष पथके असून ते या केबल्सना लक्ष्य करू शकतात. दुसरीकडे, लाल समुद्रात इराण समर्थित हूती विद्रोही केवळ सिग्नलची वाट पाहत आहेत. जर हे केबल्स कापले गेले, तर:
- बँकिंग आणि व्यवहार: ऑनलाईन बँकिंग आणि स्टॉक मार्केट ठप्प होऊ शकते.
- आयटी सेक्टर: गुगल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे डेटा सेंटर्स प्रभावित होतील.
- संपर्क: व्हिडिओ कॉल्स, ईमेल आणि सोशल मीडिया सेवा पूर्णपणे बंद पडू शकतात.
दुरुस्ती करणे का आहे अशक्य?
सामान्य परिस्थितीत या केबल्सची दुरुस्ती विशेष जहाजांद्वारे केली जाते. मात्र, सध्या या भागात युद्ध सुरू असल्याने कोणतीही विमा कंपनी किंवा रिपेअरिंग जहाज तिथे जाण्यास तयार नाही. जर एकदा केबल कापला गेला, तर इंटरनेट पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.
भारतावर काय परिणाम होईल?
भारत हे जगातील मोठे आयटी हब आहे. भारताचा बहुतांश इंटरनेट ट्रॅफिक याच समुद्री मार्गांवर अवलंबून आहे. जर इराणने हे पाऊल उचलले, तर भारतातील वर्क फ्रॉम होम, डिजिटल पेमेंट (UPI) आणि एआय (AI) सेवांना मोठा फटका बसेल.
तज्ज्ञांचा 'हा' इशारा
"हॉर्मुज आणि बाब-अल-मंडेब हे दोन्ही मार्ग बंद होणे ही जगासाठी 'विनाशकारी घटना' ठरेल. यामुळे केवळ इंटरनेटच नाही, तर जगाची डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडून पडेल."












Click it and Unblock the Notifications