एकाच दिवशी स्वातंत्र्य, मग भारतात 15 ऑगस्टला अन् पाकीस्तानात 14 ऑगस्टला जल्लोष का?
ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. याच दिवशी अखंड भारताची फाळणी होऊन, पाकिस्तानही स्वतंत्र देश झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनापासूनच भारताचा प्रत्येक नागरीक स्वतःला 'सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक' असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेऊ लागला.
थाटामाटात ध्वजारोहण करून, मिष्ठान्न वाटून हा दिवस साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? भारत-पाक एकाच दिवशी स्वतंत्र झाले तरी पाकीस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतो..? चला जाणून घेऊया.

लाँर्ड माऊंडबॅटनचे होते दोन उद्देश
मित्रांनो, 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ काँमन्समध्ये भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मंजूर झाले होते. या विधेयकात भारताला स्वातंत्र्य व पाकीस्तानची फाळणी असे दोन मुद्दे होते. एकाच दिवशी पाकीस्तानलाही स्वतंत्र मिळविण्यासाठी मोहम्मद अली जिन्नाह आग्रही होते.
खरंतर जिन्नाह यांच्यापासूनच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा मुद्दा पुढे आला होता. त्या काळात देशातील वातावरण चिघळले होते. दंगली वाढल्या होत्या. सर्वत्र अशांतता होती. लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 4 जुलै 1947 ला विधेयक पास करुन तत्काळ भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
5 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?
भारताला 15 ऑगस्टलाच स्वातंत्र्य देण्याचे ठरवले गेले याला दोन कारणं होती. पहिलं कारण होतं, भारत-पाकीस्तानच्या मागणीमुळे देशात तयार झालेली अशांत परिस्थिती. दंगली, रक्तपात नको म्हणून भारताला 15 ऑगस्टलाच स्वतंत्र करण्याचे ठरले. दुसरे कारण होते, ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. माऊंटबँटन यांच्या जीवनातील 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता.
कारण 1945 साली 15 ऑगस्टच्याच दिवशी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांसमोर शरणागती पत्कारली होती. या युद्धात लॉर्ड माउंटबॅटन हेच ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आलं. या कारणामुळे माउंटबॅटन यांच्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस अविस्मरणिय होता. हाच अविस्मरणीय दिवस अजून स्पेशल करण्यासाठी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीही 15 ऑगस्ट हाच दिवस निवडला.
पाकिस्तानात एक दिवस आधी स्वातंत्र्यदिन
1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. पाकिस्तानही याच दिवशी स्वतंत्र झाला. दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले. भारतीय विधेयकातही या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याची तारीखही 15 ऑगस्टच आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या टपाल तिकिटावरही 15 ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन आहे, असा उल्लेख केला होता.
मोहम्मद अली जिन्नाह यांनीही आपल्या पहिल्या भाषणात 15 ऑगस्ट हाच पाकीस्तानचा सार्वभौम दिवस असल्याचे सांगितले होते. मात्र 1948 पासून पाकीस्तानात 14 ऑगस्टपासून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. कारण ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरण हे पाकीस्तानात 14 ऑगस्ट 1947 ला तर भारतात 15 ऑगस्ट 1947 ला झाले होते. शिवाय त्यावेळी 14 ऑगस्टला मुस्लिमांच्या पवित्र रमजानचा 27 वा उपवास होता. ही तारीख मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र मानली जाते. म्हणून त्यानंतर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन हा 14 ऑगस्टलाच साजरा होऊ लागला.












Click it and Unblock the Notifications