दिवाळी गोड..! भारत-चीन सिमेवरील तणाव मावळला; दोन्ही देशांतील सैनिकांनी वाटली मिठाई
Army Started Patrolling On India China Border : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन या दोन देशांत गेल्या चार वर्षांपासून संघर्ष सुरु होता. मात्र आता तो कमी होताना दिसत आहे. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमच्या डेमचोक सेक्टरमध्ये शुक्रवारपासून गस्त सुरु केला. भारत आणि चीनमध्ये 2020 मध्ये जी शांतता होती तीच शांतता आता दिसत असून चीननेही आपले लष्कर मागे घेतले आहे.
दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारले
ब्रिक्स परिषदेच्या आधी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांमधील सीमा वादावर करार झाल्याचे सांगितले होते. यासाठी या दोन्ही देशांत अनेकदा चर्चा झाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेटही घेतली. या दोन्ही नेत्यांत तब्बल पाच वर्षानंतर भेट झाली. आता या दोन्ही देशांतील संबंध सुधारत असल्याचे दिसत आहे.

दिवाळीला मिठाईचे वाटप
डेमचोक सेक्टरवर गस्त सुरु केल्यानंतर आता डेपसांग या सेक्टरमध्येही लवकरच गस्त सुरु करण्यात येणार आहे. या गस्तीची दोन्ही देशांतील सैनिकांना माहिती असेल. म्हणजेच एकमेकांच्या समन्वयाने ही गस्त सुरु राहील. दिवाळीनिमित्त चीन व भारतीय सैनिकांनी गुरुवारी एकमेकांना मिठाईचे वाटप केले. लडाखमधील हाँट स्प्रिंग, काराकोरम पास, दौलत बेग, ओल्डी, कोंगकला आणि चुशूल-मोल्डी सीमेवर या दोन्ही देशांतील सैनिकांनी एकमेकांना मिठाई वाटली.
दोन्ही देशांमधील तणाव मावळला
लडाखचे खासदार हाजी हनीफा यांनी पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, युद्ध काय असते हे आम्हाला माहित आहे. दोन्ही देशांतील शांतता कराराचे आम्ही स्वागत करतो. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी. राजनैतिक मार्गाने सीमेवरील तणाव कमी झाल्याने हायसे वाटत आहे, असेही हनीफा यांनी स्पष्ट केलं.
रिजिजू यांचाही सैनिकांशी संवाद
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिवाळीनिमित्त सीमेवर भेट देऊन सैनिकांशी संवाद साधला. अरुणाचल प्रदेशातील बुमला येथे जात त्यांनी भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी काही चीनी सैनिकांचीही भेट घेतली. त्यांच्याही अडचणी समजून घेतल्या. सीमेवरील भारताची पायाभूत सुविधा पाहिल्यावर सर्वांनाच अभिमान वाटेल, असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.


Click it and Unblock the Notifications