ISROची 2026मधील पहिली भरारी!'अन्वेषा' उपग्रहाचे प्रक्षेपण; आता झुडपात लपलेला शत्रूही सुटणार नाही!
ISRO Anvesha satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सोमवारी सकाळी १०:१८ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C62/EOS-N1 ही मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. २०२६ या वर्षातील इस्रोची ही पहिलीच मोहीम असून, याद्वारे भारताने अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डीआरडीओने (DRDO) विकसित केलेला 'अन्वेषा' हा गुप्तचर उपग्रह.

(Photo Credit: @isroofficial5866)
मोहिमेचे स्वरूप: १५ उपग्रहांची अंतराळात झेप
इस्रोची व्यावसायिक शाखा 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड' (NSIL) द्वारे ही मोहीम राबवण्यात आली. PSLV रॉकेटच्या या ६४ व्या उड्डाणाद्वारे एकूण १५ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले:
७ भारतीय उपग्रह : यामध्ये मुख्य 'EOS-N1' आणि हैदराबादच्या ध्रुव स्पेसचे ७ उपग्रह समाविष्ट आहेत.
८ परदेशी उपग्रह : फ्रान्स, नेपाळ, ब्राझील आणि ब्रिटन या देशांच्या उपग्रहांचा यात समावेश आहे.
हे सर्व उपग्रह पृथ्वीपासून ६०० किलोमीटर उंचीवर सूर्य-समकालिक कक्षेत (SSO) तैनात करण्यात आले आहेत.
'अन्वेषा': भारताचे अंतराळातील 'तिसरा डोळा'
'अन्वेषा' हा केवळ एक उपग्रह नसून भारताचे एक सामर्थ्यवान गुप्तचर अस्त्र आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेले 'हायपरस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग' (HRS) तंत्रज्ञान.
कसे काम करते हे तंत्रज्ञान?
सामान्य कॅमेरे केवळ काही रंगांच्या छटा टिपू शकतात, मात्र अन्वेषा शेकडो सूक्ष्म प्रकाश छटा कॅप्चर करतो. हे एखाद्या स्कॅनरसारखे काम करते, जे केवळ वस्तूच नाही तर ती वस्तू कशापासून बनली आहे (माती, धातू किंवा कापड) हे देखील ओळखू शकते.
संरक्षण क्षेत्रासाठी 'गेम चेंजर'
अन्वेषा उपग्रहामुळे भारतीय सशस्त्र दलांना खालील बाबतीत मोठी मदत होणार आहे: १. शत्रूचा शोध: दाट जंगले, झुडपे किंवा बंकरमध्ये लपलेले शत्रूचे सैनिक आणि त्यांची हालचाल ६०० किमी उंचीवरून टिपणे शक्य होईल. २. पाण्याखालील पाळत: नदीच्या पाण्याखाली लपवलेली शस्त्रे किंवा मानवी क्रियाकलाप शोधण्याची क्षमता यात आहे. ३. युद्धभूमीचे विश्लेषण: एखाद्या भागातील माती चिकट आहे की वाळवंटी, तिथे लष्करी टँक जाऊ शकतात की नाही, याची अचूक माहिती हा उपग्रह देईल. ४. ३डी सिम्युलेशन: युद्धादरम्यान शत्रूची रचना समजून घेण्यासाठी याच्या डेटावरून ३डी प्रतिमा तयार केल्या जाऊ शकतात.
खाजगी क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल
या मोहिमेत प्रथमच भारतीय खाजगी कंपनीने (ध्रुव स्पेस) इतका मोठा वाटा उचलला आहे. भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप मानली जात आहे. पीएसएलव्ही (PSLV) हे जगातील सर्वात विश्वासार्ह रॉकेट का मानले जाते, हे या मोहिमेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
याचे काय आहेत अन्य फायदे!
केवळ संरक्षणच नव्हे, तर नागरी कामांसाठीही या उपग्रहांचा वापर केला जाईल:
- वन सर्वेक्षण: जंगलातील झाडांचे आरोग्य आणि घनता मोजणे.
- खाणकाम: खनिजांचा शोध आणि त्या ठिकाणच्या हालचालींवर लक्ष ठेवणे.
- पर्यावरण: हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर देखरेख ठेवणे.












Click it and Unblock the Notifications