हे 2 पंतप्रधान जे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू शकले नाही! कुणी कितीदा फडकवला तिरंगा? वाचा
Independence Day 2024 : देशाचा तिरंगा ध्वज फडकावण्याचा मोठा मान असतो. आता तर हर घर तिरंगा सारख्या अभियानामुळे तिरंगा ध्वज फडकावण्याची संधी सर्वांनाच मिळत आहे. पण देशाचे दोन पंतप्रधान असेही आहेत ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावता आला नाही. यातील एक पंतप्रधान तर दोनवेळा पद भुषवले आहे.
देशासोबतच जसा तिरंगा राष्ट्रध्वज आपल्यासाठी प्राणप्रिय आहे, तसाच ऐतिहासीक लाल किल्लाही भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताच्या याच लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान आणि स्वातंत्र्यसेनानी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला होता. हा सुवर्णसोहळा लालकिल्ल्यावर झाला होता. हाच लाल किल्ला या स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे.

तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी (Independence Day) लाल किल्ल्यावरुन प्रत्येक स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावला जातो आणि राष्ट्राला संबोधित केले जाते. पण असे दोन पंतप्रधान होते ज्यांना लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे भाग्य लाभले नाही हे तु्म्हाला माहीत आहे का..चला तर हा इतिहास आपण जाणून घेऊया.
हे आहेत ते दोन पंतप्रधान
स्वतंत्र भारताच्या इतिहासात ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही, त्यात गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर हे दोन पंतप्रधान आहेत.
गुलझारीलाल नंदा दोनदा पंतप्रधान
गुलझारीलाल नंदा हे दोनदा पंतप्रधान झाले आहेत. ते पहिल्यांदा 27 मे ते 9 जून 1964 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्यांदा 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 या काळात ते पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या दोन्ही कार्यकाळात 15 ऑगस्ट (Independence Day) आला नाही. त्यामुळे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी त्यांना मिळाली नाही.
काळजीवाहू पंतप्रधान होते गुलझारीलाल नंदा
गुलझारी लाल नंदा यांना दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांना दुसऱ्यांदा काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले. त्यांचे दोन्ही कार्यकाळ काही महिन्यांचेच होते.
चंद्रशेखर यांनाही मिळाली नाही संधी
चंद्रशेखर हे भारताचे असे दुसरे पंतप्रधान होते, ज्यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. चंद्रशेखर हे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात 15 ऑगस्ट ही तारीख आली नाही. त्यामुळे ते सुद्धा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाही.
कुणी फडकवला सर्वात जास्तवेळा तिरंगा

लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम पंडित नेहरूंच्या नावावर आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ते मे 1964 या कालावधीत सलग 17 वेळा तिरंगा फडकवला. दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधींचा क्रमांक येतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात 16 वेळा तिरंगा फडकवला. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून 10 वेळा ध्वजारोहण केले.
पीएम मोदी, वाजपेयींनी कितीवेळा फडकवला तिरंगा?

काँग्रेसच्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नंबर लागतो. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी सहावेळा तिरंगा फडकवला आहे.विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयींना पहिल्या टर्ममध्ये तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. ते फक्त तेरा दिवसच पहिल्या टर्ममध्ये पंतप्रधान होते.2014 पासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत.












Click it and Unblock the Notifications