'माझ्या विवेकाचे शिल्पकार'; गौतम अदानींनी उलगडला त्यांच्या यशामागील 'स्त्री-शक्ती'चा प्रवास
Gautam Adani Women's Day message : आयुष्यातील सर्वात मजबूत पाया काँक्रीट किंवा स्टीलने नव्हे, तर आपल्या चारित्र्याला आकार देणाऱ्या माणसांनी बांधला जातो", अशा शब्दांत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, त्यांनी एका विशेष निवेदनाद्वारे त्यांच्या जीवनावर आणि मूल्यांवर प्रभाव पाडणाऱ्या महिलांविषयी भावना व्यक्त करत त्यांना मानवंदना दिली.

आई: धैर्याचे आणि संस्कारांचे पहिले विद्यापीठ
गौतम अदानी यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या आईच्या आठवणींनी केली. बालपणी आईने सांगितलेल्या भारतीय महाकाव्यांमधील कथांनी त्यांच्यावर खोलवर परिणाम केला. ते म्हणाले की, त्या कथा केवळ गोष्टी नव्हत्या, तर धैर्य, त्याग, कर्तव्य आणि श्रद्धेचे पाठ्यपुस्तकांपेक्षाही मोठे धडे होते.
वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांनी मुंबईत नशीब आजमावण्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या आईने दाखवलेले धाडस आजही त्यांना थक्क करते. एका अनिश्चित भविष्यात आपल्या मुलाला पाठवण्यासाठी लागणारे ते 'आईचे काळीज' आजच्या यशाचा पाया ठरले.
प्रीती अदानी : 'विवेकाची रक्षक'
आपल्या पत्नीबद्दल, प्रीती अदानी यांच्याबद्दल बोलताना गौतम अदानी भावूक झाले. त्यांनी प्रीती अदानी यांचे वर्णन "माझ्या विवेकाची रक्षक" असे केले. एक पात्र दंतवैद्य असूनही, प्रीती अदानी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. आज त्यांच्या नेतृत्वाखालील 'अदानी फाउंडेशन' भारतातील 22 राज्यांमधील 1 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनात शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत उपजीविकेचा प्रकाश पसरवत आहे.
सुना-नातवंडे : भविष्याचा व करुणेचा दृष्टिकोन!
गौतम अदानी यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचेही कौतुक केले. त्यांच्या सुना परिधी अदानी आणि दिवा शाह यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
ते म्हणाले की, परिधी अदानी या एक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या वकील आहेत, त्यांच्या विचारशील दृष्टिकोनाचा अदानींना अभिमान वाटतो. तर दिवा शाह एक कल्पक डिझायनर, ज्यांच्या कामात अपंग व्यक्तींबद्दलची करुणा आणि संवेदनशीलता दिसून येते.
तसेच, आपल्या तीन नातवंडांविषयी बोलताना गौतम अदानी म्हणाले की, बोर्डरूममधील गंभीर चर्चांचा ताण नातवंडांच्या एका मिठीने विरघळून जातो. नातवंडांसोबत घालवलेले क्षण त्यांना पुढील पिढीप्रती असलेल्या जबाबदारीची आणि राष्ट्र उभारणीच्या उद्देशाची सतत आठवण करून देतात.
राष्ट्र उभारणी आणि कौटुंबिक मूल्ये
"एखादी व्यक्ती आयुष्यभर बंदरे, विमानतळ आणि वीज प्रकल्प उभारू शकते, परंतु कुटुंबासोबतचे क्षणच तुम्हाला जगण्याचा खरा उद्देश देतात," असे मत त्यांनी मांडले. राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या मोठ्या व्हिजनला आकार देण्यात या सर्व महिलांचा वाटा सिंहाचा असल्याचे त्यांनी मान्य केले. थोडक्यात सांगायचे तर, गौतम अदानी यांचा हा संदेश केवळ एका उद्योगपतीचा विचार नसून, एका कृतज्ञ पुत्राचा, पतीचा आणि आजोबांचा आपल्या कुटुंबातील 'शिल्पकारांना' दिलेला मानाचा मुजरा आहे.












Click it and Unblock the Notifications