अखेर वाल्मीक कराडवरही मकोका:खंडणी प्रकरणात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. यात खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज म्हणजे मंगळवारी संपली आहे. कराडला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद केला.
वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद करत माझ्या क्लाइंटला विनाकारण अडकवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. युक्तिवाद झाल्यानंतर वाल्मिक कराडला केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर मोक्का देखील लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे सीआयडीने आता कोर्टाकडे अर्ज केला असून त्वरीत कराड यांना चौकशीसाठी आमच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी देखील केली आहे.
कोर्टात दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद झाला?
सरकारी वकील - कराडला दहा दिवसांची सीआयडी कोठडी द्या, अशी मागणी केली.
कराड वकील (सिद्धेश्वर ठोंबरे) - विनाकारण सीआयडी कोठडी देण्याची गरज नाही. वाल्मिक कराड हे तपासाला सहकार्य करत आहेत.
सरकारी वकील- कराडच्या सांगण्यावरुन घुले आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला होता. खंडणी मागणीच्या फोननंतर आवादा कंपनीचे कर्मचारी घाबरले होते.
कराडचे वकील - बातम्यांमध्ये कराड यांचे नाव आले तर त्यावरुन ते आरोपी कसे, त्यांचा खूनाच्या प्रकरणात काहीही संबंध नाही. आणखी दहा दिवस सीआयडी कोठडी कशासाठी हवी आहे.
सरकारी वकील : कराड यांचे विदेशात संपत्ती आहे का, ती तपासण्यासाठी तसेच खून प्रकरणात त्यांचा संबंध आहे का नाही, याची चौकशी करण्याजी गरज आहे. त्यामुळे दहा दिवस सीआयडी कोठडी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.
कराडचे वकील - गेल्या पंधरा दिवसांपासून वाल्मिक कराड हे सीआयडी कोठडीत आहेत. त्या काळात त्यांनी खूनाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मग पुन्हा सीआयडी कोठडीची मागणी का केली जाते.

कराडच्या वकीलांनी काय केला युक्तिवाद?
वाल्मिक कराड यांच्याकडून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात युक्तिवाद करणार केला. त्यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. वाल्मिक कराड यांची यापूर्वी त्यांच्यावर दाखल झालेल्या 14 गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झालेली आहे. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे, असा सवाल वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी उपस्थित केला.
वाल्मिक कराडची पोलिस कोठडीची गरज काय?
सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती. तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. मग तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी का करण्यात आली नाही? हा सगळा तपास पोलीस 15 दिवसांपूर्वी करणार होते. मग पोलिसांनी 15 दिवसांत काय केले? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही, ते आम्हाला सांगा. पण आता वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.
न्यायालयात नेण्यापूर्वी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी
दरम्यान न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मीक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप होत आहे.
कराड समर्थक आक्रमक
खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून परळीमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान एका समर्थकाला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाल्मीक अण्णा हा परळीचा देवमाणूस म्हणत कराड समर्थक टॉवरवर चढून आंदोलन करत आहे.
कराडच्या आवाजाचे घेतले नमुने
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला अटक करण्यात आली होती. खंडणीच्या तपासात चाटे याने आपल्याच फोनवरून कराडने 29 नोव्हेंबरला खंडणीसाठी बोलणी केल्याची माहिती सीआयडीला दिली होती. यासाठी दोघांच्या आवाजाचे नमुने सीआयडीला तपासासाठी आवश्यक होते.
सुरुवातील चाटेच्या आवाजाचे नमुने घेतले, नंतर कराड याचे तीन मोबाइलही पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर आता कराडच्या आवाजाचे नमुने रविवारी बीड शहर ठाण्यात घेतले.आज मंगळवारी दुपारी कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. बीडमध्ये चारपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. आंदोलन, मोर्चे यावरही बंदी घालण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत हा मनाई आदेश असेल, असे बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
सरकारी वकील गैरहजर, चाटेला न्यायालयीन कोठडी
खंडणीच्या गुन्ह्यातून संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या विष्णू चाटे याची दोन दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर सोमवारी केजच्या जिल्हा व अतिरिक्तसत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे गैहजर राहिल्याने न्यायालयात सुनावणी झाली नाही. त्यामुळे चाटे याला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
खंडणी, खुनाचे प्रकरण एकच- जरांगे यांचा आरोप
मुख्यमंत्री खंडणीतील आरोपीला वाचवत आहेत. खंडणीतील आरोपी सरकार चालवतो काय? असा सवाल करीत जरांगे यांनी खंडणी आणि खून प्रकरण एकच आहे असे सांगितले. त्यामुळे सर्वांना या गुन्ह्यात आरोपी करा, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा आणि मकोका लावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर जरांगे यांनी संवाद साधला.
नवीन एसआसयटी स्थापन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेली एसआयटी आता बदलण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. जुन्या एसआयटीमध्ये वाल्मीक कराडच्या ओळखीचे अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे नवीन एसआय टी स्थापन करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications