धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, वाल्मिक कराडला मोक्का लावा... सुरेश धसांनी आता सगळंच काढलं
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आज आ. सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. जोरदार भाषण करत धस यांनी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली. शिवाय आठ जणांना मोक्का लावल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुकही केले.

काय म्हणाले सुरेश धस?
संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले, यांना हव्या असणाऱ्या खंडणीच्या मध्ये आल्यामुळे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. या लोकांनी ५० लाखांची खंडणी निवडणुकीसाठी अगोदरच घेतली होती. राहिलेल्या दीड कोटी खंडणीसाठी देशमुखांची हत्या झाली. दलित व्यक्तीला वाचवायला गेले आणि देशमुख यांच्या टार्गेटवर आले. मुख्यमंत्री म्हणाले होते, या सर्वांना मोक्का लावू. तो लावला. मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात. मात्र आता वाल्मिक कराडवरही मोक्का लावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
धनंजय मुंडेबाबत काय म्हणाले?
सुरेश धस यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनाही टार्गेट केले. ते म्हणाले, अजितदादा माझी विनंती आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा. त्याच्याऐवजी कायंदे यांना मंत्रिपद द्या किंवा इतर कोणालाही मंत्रीपद द्या. मी मंत्रीपदासाठी हे करत नाही. धनंजय मुंडे या व्यक्तीने खूप वाटोळे केले आहे. त्यांना सत्तेत ठेवले म्हणून ते काहीही करायला लागले आहेत. माणसे उचलून नेतात. खंडणी मागितली जाते, कुणालाही मारले जाते. मंत्रिपद गेल्यावर हे सगळं शांत होईल, असंही आमदार सुरेश धस यांनी म्हटलं.
सप्ताहाबाबतही मोठं वक्तव्य
सुरेश धस म्हणाले, भगवानगड व नारायण गड हे दोन्हीही सर्वांच्या आदराची ठिकाणे आहेत. या दोन्ही ठिकाणांचा सप्ताह परळीसोडून इतर सर्वत्र होतो. माझ्या आष्टीतही हा सप्ताह होतो. मग हा सप्ताह परळीत आत्तापर्यंत का झाला नाही..? शास्त्री महाराज किंवा विठ्ठल महाराजांना आत्तापर्यंत परळीत का बोलावले गेले नाही...? संतांचा विसर पडलेली ही लोक आहेत, त्यांच नाव घेऊ नये, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.












Click it and Unblock the Notifications