गेली पाच वर्ष पक्ष फोडाफोडीनं गाजली; फडणवीसांनाच्या नावावर झाला होता 'तो' विक्रम, आता काय होईल...
Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत येणाऱ्या विधानसभेची रणधुमाळी सुरु केली. महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळं 2024 च्या विधानसभा निवडणुकींकडे लक्ष लागले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण कसं बदललं, आणि कुणी कुठे बाजी मारली होती. याच विषयाच आपण आज आढावा घेणार आहोत.
2019 च्या निवडणुका कशा होत्या
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा 145 आहे. 2019 साली भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभा लढवली होती. भाजपला 105 जागांवर यश मिळालं, तर शिवसेना 58 जागांवर विजयी झाली. मात्र, निकाल लागताच मुख्यमंत्रीपदावरुन युतीचं बिनसलं आणि शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस 44 जागा जिंकून चौथ्या क्रमांकावर राहिली होती.

गेली पाच वर्षे घडामोडींनी गाजली
शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्यानंतर सरकारची समिकरणे बदलली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निर्माण झाली. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. त्यात 58 जागा जिंकलेली शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली.
अजित पवार दादांनी आणला होता ट्विस्ट
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापन करील अशा चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा केला. राजभवनात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 23 नोव्हेंबर 2019 चा हा पहाटेचा शपथविधी तेव्हा राज्यात खळबळ उडवून देणारा ठरला. मात्र लगेच अजित पवारांनी यू-टर्न घेत 80 तासांत शब्द फिरवला. देवेंद्र फडणवीसांना काही तासांत राजीनामा द्यावा लागला. सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.
उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री
अजित पवार स्वगृही परतल्यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. मात्र अडीच वर्षांतच कोसळले आणि त्याला कारणीभूत ठरले ते एकनाथ शिंदे यांचे बंड. 2022 साली जून महिन्यात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे हे काही शिवसेना आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले. त्यानंतर सूरतमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले. एकनाथ शिंदे यांना 40 आमदारंचा पाठिंबा मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले
त्यानंतर भाजपने बंडखोरांसोबत सरकार बनवलं. एकनाथ शिंदें 30 जून 2022 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत फाटाफूट झाली. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारला येऊन मिळाले. 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात महायुती जन्माला आली.
सध्याची स्थिती काय?
विधानसभा जागांचा विचार करता महाराष्ट्रात सहा रिजन मानले जातात. त्यात पश्चिम महाराष्ट्रात 70 जागा, विदर्भात 62 जागा, मराठवाड्यात 46 जागा, ठाणे आणि कोकणात 39 जागा, मुंबईत 36 जागा आणि उत्तर महाराष्ट्रात 35 जागा आहेत. गेल्यावेळी मराठवाडा, ठाणे आणि कोकणात भाजप आणि शिवसेनेने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे सरकार स्थापन झाले होते. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची सध्याची स्थिती पाहता महायुतीच्या एकूण तीन घटक पक्षांकडे 178 पेक्षा अधिक आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीतील पक्षांकडे सध्या 75 आमदार आहेत. त्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र बदलणार का? हे आता नोव्हेंबर अखेपर्यंतच समजणार आहे.












Click it and Unblock the Notifications