बीडमधील वातावरण आणि मल्हार मटन; शरद पवारांनी पहिल्यांदा साधला निशाणा, काय म्हणाले?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ८२ दिवसांनी राजीनामा दिला. या प्रकरणावर आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट निशाणा साधला. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. शिवाय मल्हार झटका मटनाबाबतही त्यांनी भाष्य केले.

काय म्हणाले शरद पवार?
बीडमधील एकंदर परिस्थिती आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला झालेला उशीर याबाबत आज शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आज बीडची जी अवस्था आहे, ती यापूर्वी कधीच नव्हती. मी बीडला चांगला ओळखतो. माझ्या अनुभवाप्रमाणे बीड जिल्हा हा शांत व संयमी आहे. येथे सहा-सहा सदस्य मी निवडून आणले आहेत. दुर्देवाने जे निवडून आले त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. त्याचे दुष्परीणाम आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय, असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
सरकारकडून अपेक्षा काय?
शरद पवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारने यात कोण आहे, याचा विचार न करता कारवाई करावी. जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करील, त्याच्याविरोधात सक्त पावले उचलावीत. बीडचं वातावरण असं नव्हतं. पण हे ज्यांनी केलं, त्यांच्यावर कारवाई व्हावी. धार्मिक तेढ, बिघडलेली परिस्थिती, गैरफायदा घेणारे घटक यांना राज्य सरकारने सामोरे जावे, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. सत्तेचा गैरवापर करुन जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न जो करेल, त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मटणाच्या मुद्यावरही भाष्य
मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावं, असं आव्हान मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. या मुद्यावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही. हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का ?' असं म्हणत त्यांनी मुद्दा महत्वाचा नसल्याचे सांगत झटकून टाकला.












Click it and Unblock the Notifications