Womens Day 2025 : रासायनिक अन्न हेच आजाराचं मूळ, मला हे बदलायचंय... राहिबाईंनी सांगितलं अगदी मनातलं
Womens Day 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका छोट्याशा गावापासून ते पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा असाच आहे. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावात त्या राहतात. देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार मिळविणाऱ्या राहिबाई अगदी नावाप्रमाणेच साध्या राहणीमाणाच्या आहेत.
नऊवारी लुगडं, नाकात नथ, कपाळावर भलं मोठं कुंकू अशा पेहरावातील या पद्मश्रींसोबत वन इंडियाने दिलखुलास गप्पा मारल्या. राहीबाईंचा खडतर प्रवास आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेतला. त्यांच्या बोलण्यातून निसर्गाबाबतचे प्रेम व निसर्ग संवर्धनाची तळमळ स्पष्ट जाणवत होती. वन इंडियासोबत त्या अगदी मनमोकळं बोलल्या...

गावातच सुरु केली सीड बँक
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम कोंभाळणे गावात त्या राहतात. या गावात ना प्रवासाची जास्त साधने ना कुठल्या सोयी सुविधा. मात्र तरीही राहिबाईंनी याच गावात सीड बँक सुरु केली. या बँकेत आत्तापर्यंत २५० पेक्षा जास्त देशी वाणांच्या बियांचे संकलन त्यांनी केले आहे. या बियांचे संवर्धन करुन त्यांनी एक अनमोल ठेवा, जतन करुन ठेवलाय. याच क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना बीजमाता म्हणून ओळख मिळाली. तसेच देशातील चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने राहीबाईंना गौरवण्यात आले.
संघर्षमय राहिलाय प्रवास
पद्मश्री पुरस्कारापर्यंत राहिबाईंचा प्रवास साधा नव्हता. तो प्रवास संघर्षमय राहिला आहे. अन्नधान्याच्या संकरित वाणांमुळेच आजार वाढलेत, हे राहिबाईंनी ओळखलं होतं. पूर्वी बाळ जन्माला यायचं तेव्हा कुपोषण हा प्रकार नव्हता. मात्र अलिकडे लहान मुलांमध्ये कुपोषितपणा अनेकदा दिसतो. आताच्या बाळांचा जन्म होतो तेव्हाच त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला. संकरित वाणांमुळे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी तर होत नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला. यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ बांधली. आणि तेथूनच सुरु झाला त्यांचा बीजमाता होण्यापर्यंतचा प्रवास.
जतन केली बियाणे
बचत गटाच्या माध्यमातून काम राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाहीत. राहीबाईंनी ज्या गावठी बियाण्याचे संवर्धन केले आहे ते मूळ स्वरूपात आहे व त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते. राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी सोबत घेऊन बचत गट बनवला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. पारंपरिक पद्धतीनं जतन केल्या बिया पद्मश्री राहीबाई यांची सीड बँक जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्या उत्साहाने सगळ्या बियाण्यांबद्दल आपुलकीने माहिती देतात.
अस्सल देशी वाणांचे जतन
राहिबाईंच्या मते, आजकालच्या भाज्या आणि पीके ही रासायनिक खतांचा वापर करून घेतली जातात. त्यामुळे आजार वाढतात. परंतु देशी बियाणे ही शुद्ध हवेवर आणि पाण्यावर येतात. त्यामुळे ती नैसर्गिक असतात. आपण ज्या भाज्या बद्दल कधीही ऐकलं नाही. त्या भाज्यांचं वाण राहिबाईंनी पारंपारिक पद्धतीने जतन करून ठेवले आहे. त्यांच्या मते आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहील, असा त्यांचा आत्मविश्वास आहे. राहीबाईंच्या सीड बँक मध्ये आज अनेक पिकांचे 250 पेक्षा अधिक वाण आहेत. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान आहे. अकोले तालुक्यासह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात, असेही त्या सांगतात.












Click it and Unblock the Notifications