'त्या' वक्तव्यानंतर थोरात-विखेंमधला वाद विकोपाला; जाळपोळ, विखेंच्या ताफ्यातील गाडीवरही हल्ला
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वातावरण गेल्या आठ दिवसांपासून चांगलेच तापले आहे. थोरात विखेंच्या तिसऱ्या पिढीतील कलगीतूरा सध्या महाराष्ट्राला दिसत आहे. शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या सभेत एका ज्येष्ठ नेत्यांने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद वाढला. आक्षेपार्ह वक्तव्य करणारे व विखे यांचे समर्थक म्हणवले जाणारे वसंतराव देशमुख यांना अटक करा, अशी मागणी थोरात समर्थकांनी केली. त्यानंतर तणाव वाढला. विखे यांचे बँनर्स फाडण्यात आले व त्यांच्या ताफ्यातील काही गाड्यांवर दगडफेक झाल्याची चर्चाही रंगली. सध्या संगमनेर तालुक्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धांदरफळच्या सभेत नेमकं काय झालं
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे सध्या संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढविण्याची चाचपणी करत आहेत. भाजपाने सुजय विखेंना तिकीट देण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी काल (दि. २५ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. हे विधान अपमानास्पद असल्याचा आरोप करत काही क्षणातच धांदरफळ गावात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संपूर्ण संगमनेर तालुक्यात या प्रकाराची चर्चा वाढली आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडून निषेध व्यक्त केला.
विखेंच्या ताफ्यातील गाड्यांची मोडतोड
वसंतराव देशमुख यांच्या विधानानंतर स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सभास्थळी धडक दिली. काही महिलांनी थेट स्टेजवर चढून ठिय्या मांडला. देशमुख यांनी माफी मागण्याची मागणी लावून धरली. देशमुख यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. सभेनंतर विखे यांच्याबरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. सभेचे आयोजक व संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी मध्यरात्रीनंतरही हजारोंचा जमाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देऊन बसला.
थोरात, तांबे यांनी केला निषेध व्यक्त
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन या घटनेचा निषेध व्यक्त केला. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांनी याच वसंतराव देशमुख यांचा चांगला समाचार घेतला होता. याची आठवण करून देताना या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली. वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशा लोकांना त्यांची जागा दाखविण्याची, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
डॉ. सुजय विखे यांनीही व्यक्त केला निषेध
संगमनेर मधील वातावरण पेटल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीनंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, वसंतराव देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे भाषण चालू असताना दोनदा त्यांना कार्यकर्त्यांनी थांबण्याबाबत सुचविले, परंतु ते थांबले नाहीत. त्यानंतर मी माझ्या भाषणाच्या तयारीला लागलो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे माझे लक्ष नव्हते. असे असले तरी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीची कारवाई होईल, त्याच पद्धतीची कारवाई आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर हल्ले करणाऱ्या लोकांवर देखील केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications