मुख्यमंत्र्यांनी 40 टक्के, त्यांच्या मुलाने 20 टक्के कमिशन ठेकेदारांकडून घेतलंय, राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आज पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधला. हे सरकार कर्जावर सुरु असून, लाडक्या बहिणीचा चौथा हप्ता द्यायलाही सरकारकडे आता पैसे शिल्लक नसल्याचा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला. याशिवाय सरकारच्या तिजोरीत पैसाच शिल्लक नसून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांधे होणार आहेत, असा घाणाघात संजय राऊत यांनी केला.
लाडकी बहिणीचा हप्ता द्यायला पैसे नाहीत
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "सरकार सध्या कर्ज काढून घोषणा करतंय. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी लाखो-कोटींच्या घोषणांची खैरात वाटली. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तरी होतील का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडं तर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता देण्याची सुद्धा ताकद नाही. मोदींनी घोषणा तर केली पण त्यासाठी पैसा आणणार कुठून..? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. सरकारी कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांचेदेखील पगार होणार नाहीत", असा दावाही संजय राऊतांनी केला.

मुख्यमंत्री व त्यांच्या मुलावर कमिशनचा आरोप
संजय राऊत पुढे म्हणाले की, "सध्या महाराष्ट्रात फक्त ठेकेदारीचा खेळ सुरु आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे. ठेकेदारांकडून सरकारनं 40 टक्के कमिशन अॅडव्हान्स घेतलंय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 40% कमिशनवर काम करताहेत. त्यांच्या मुलानंही 20% कमिशन घेतलंय. ठेकेदारांकडून अगोदरच 60 टक्के कमिशन वसूल करण्यात आल्याने राज्यातील सर्व ठेकेदार सध्या कंगाल झाले असून ते भिकेला लागलेले आहेत, असा गंभीर आरोप करुन संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली.
मुख्यमंत्री मुघलांचेच वंशज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहे. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचे आका, मालिक, बॉस हे दिल्लीत बसले आहेत. त्यांना मुजरा करायला यांना दिल्लीत जावं लागतं. एकेकाळी दिल्लीत ब्रिटिशांची सत्ता होती. तेव्हा जावं लागत होतं. त्या अगोदर मुघलांची सत्ता होती. तेव्हा औरंगजेब, अकबर इथून जात होते. हे सगळे त्यांचेच वंशज आहेत."












Click it and Unblock the Notifications