निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकीची घोषणा, सत्ताधारी-विरोधक म्हणाले-...!
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र व झारखड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर त्याचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. दरम्यान, आयोगाने संपूर्ण आचारसंहितेचा कालावधी देखील जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया अशी असेल...!
23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कारण, यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची व अनोखी असणार आहे. दोन पक्षांचे झालेले विभाजन आणि लोकसभेत झालेला बदल तसेच जरांगे फॅक्टर देखील अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. चला तर जाणून घेऊया, निवडणूक आयोगाच्या प्रेसनंतर कोण काय म्हणाले, वाचा सविस्तर....!

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा!
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या प्रेसवर प्रतिक्रिया दिली. तर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणूक जाहीर होण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहत होती. निवडणूक होत आहे याचा आनंद आहे. हरियाणात जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक होत आहे. नाही तर राष्ट्रपती राजवट लावली असती. महाराष्ट्र बुडवण्याचे काम करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा विश्वास आम्हाला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीला अनकुल परिस्थिती आहे. हे सरकार 30 टक्क्यांपर्यंत कमिशन घेत होते. मतदार यांना माफ करणार नाही. निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल. मात्र जनता बळी पडणार नाही. महाविकास आघाडीचे 222 जागांवर एकमत झाले आहे. दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार आहे. दिल्लीत उद्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे, त्यात निर्णय होईल. सरकारची आजची जाहिरात पाहिली. त्यात तेलगंणातील योजना बंद असून सरकारने जाहिरात दिली. फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केले गेले आहे.
जनता यांचा भोंगा वाजवेल..!
दोन दिवसांत आमच्या पाच गॅरंटी जाहीर होणार आहे. कोण महिलांना फसवतंय ते स्पष्ट होईल. शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणारी योजना आम्ही आणली. मात्र ती बंद पाडण्यात आली. या योजनेबरोबर महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल. कमी कालावधी मिळावा हा प्लॅनिंग होता. नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? 40 दिवसांचा कमीत कमी कालावधी असला पाहिजे. मात्र 35 दिवसात निवडणूक घेत आहेत. जनता यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही, असाही निशाणा
जरांगे यांचा फडणवीसांवर निशाणा..!
आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं. आता कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
कॉंग्रेसचा महायुतीवर निशाणा, जनतेला आवाहन
केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा झाल्यानंतर कॉंग्रेसच्या वतीने निवेदन जारी करत सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या जुमलेबाजीला फसू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी मविआलाच विजयी करा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.
नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच आहे पण महाराष्ट्रातील टोल का माफ केले नाहीत? मुंबई व महाराष्ट्राची जनता वेगळी आहे का? फडणवीस व गडकरी यांनीच 'टोलमुक्त महाराष्ट्र' करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? १० वर्षापासून भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. भाजपा युतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे पण फडणवीस सक्षम गृहमंत्री अशी जाहिरात बाजी केली जात आहे परंतु फडणवीस हे सर्वात निक्रीय गृहमंत्री आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले...!
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 - रोजी निवडणूक जाहीर केली. याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती युतीचा भगवा झेंडा फडकवण्याकरता आम्ही सिद्ध झालेलो आहोत. पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे. सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रातील निवडणुका लढणार आहोत. या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केलेले आहे.
लाडकी बहीण, तरुणांसाठी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, डॉक्टरांसाठी अशा प्रत्येक घटकासाठी महायुती सरकारने काम केले असल्याने ते युतीलाच मतदान करतील. यापूर्वी अडीच वर्षांपूर्वीचे सरकार फेसबुक लाईव्ह करणारे सरकार, बंद रुममधून महाराष्ट्र राज्याचा कारभार बघणारा मुख्यमंत्री या राज्याने पाहिला आणि सव्वा दोन वर्षांमध्ये रात्रंदिवस काम करणारा प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रापर्यंत अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावरती महायुतीची सत्ता येणार आहे. शिवसेनेचा खासदार म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते.












Click it and Unblock the Notifications