शिवसेना नेते संजय राठोड सलग पाचव्या विजयाच्या ध्येयाने रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरुण आणि सळसळत्या रक्ताच्या कार्यकर्त्यांना संघटनेत मानाचे स्थान आणि जबाबदाऱ्या दिल्या. बेदरकार आणि कोणत्याही परिणामांची परवा न करता आव्हानांना भिडणार्या हजारो तरुणांनी बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला.
आज विधिमंडळात तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा निवडून गेलेल्या आमदारांचे वय पाहिले तर त्यांनी वयाच्या विशीत राजकारणात प्रवेश केल्याचे दिसून येते. ऐन तारुण्यात प्रस्थापितांशी केलेल्या संघर्षामुळे या नेत्यांना संधी मिळत गेल्या आणि शिवसेना वाढत गेली. मुंबई, ठाणे, कोकण या परिसरा बरोबरच मराठवाड्यात शिवसेनेला मोठी स्पेस मिळाली आणि बघता बघता पश्चिम विदर्भ देखील शिवसेनेचा झाला.

पश्चिम विदर्भात शिवसेनेसाठी ज्या तरुणांनी प्रचंड काम केले त्यातले एक महत्वाचे नाव म्हणजे संजय राठोड. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजय राठोड यांनी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेबांचे नेतृत्व आणि संघटनेचा आवाका यामुळे ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून निवडले गेले. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी संजय राठोड यांनी केली आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड हा तरुण सर्वतोमुखी झाला.
आक्रमक आणि बेधडक शिवसैनिक
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना अत्यंत आक्रमक आणि बेधडक शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. यवतमाळ मधील जवाहरलाल दर्डा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठ आंदोलन केलं. या आंदोलनाने राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बघता बघता संजय राठोड यांनी यवतमाळच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण करून घेतला आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली.
एकेकाळी यवतमाळ जिल्ह्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विलासराव देशमुख यांचे निकटवर्ती माणिकराव ठाकरे यांचे वर्चस्व होते. पण माणिकरावांच्या वर्चस्वाला संजय राठोड यांनी थेट शिंगावर घेतले. दारव्हा या मतदारसंघावर छोट्या छोट्या ग्रामपंचायतीवर देखील काँग्रेसची सत्ता होती पण बघता बघता संजय राठोड यांनी या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004 साली तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
सलग चार विजय
2009 मध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. आणि संजय राठोड यांच्या दारव्हा विधानसभा मतदारसंघाची देखील पुनर्रचना करण्यात आली. त्यांचा दारव्हा हा मतदारसंघ रद्द होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात 2009 साली त्यांनी तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा जायंट किलर होण्याचा मान मिळवला.
2014 मध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुई खेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2014 साली सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात होते त्यामुळे संजय राठोड यांचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीतून लढताना त्यांनी संजय देशमुख यांचे तगडे आव्हान लीलया मोडून काढले आणि ते साठ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आणि त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली.
बंजारा समाज राठोड यांच्यामुळे शिवसेनेसोबत
संजय राठोड ज्या दिग्रस मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात बंजारा, कुणबी या समाजाचे वर्चस्व आहे. बंजारा समाजाची मते या मतदारसंघात नेहमीच निर्णायक राहिलेली आहेत. राठोड यांनी ही मते शिवसेनेच्या बाजूने फिरवली. ग्रामीण भागात शिवसेनेचे जबरदस्त संघटन उभे करणारा यवतमाळ मधील नेता म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी यवतमाळ सारख्या जिल्ह्यात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेषतः आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले सामाजिक काम प्रचंड मोठे आहेत. जगद्विख्यात नेत्रचिकित्सक तात्या लहाने यांच्याकडून त्यांनी आपल्या मतदारसंघात नेत्रचिकित्सा शिबिर घेतले आणि हजारो लोकांच्या डोळ्यावर उपचार करून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी मोठमोठे आंदोलने केली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
विकासकामांवर भर
सामाजिक आणि राजकीय काम उभे करताना त्यांनी दिग्रस मध्ये विविध विकास कामावरही चांगलाच भर दिला.पोहरादेवी हे बंजारा समाजाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. संजय राठोड यांच्या मदतीने वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे बंजारा विरासत वस्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. दिग्रस हा परिसर आरोग्य सुविधांच्या बाबतीत काहीसा मागास मानला जातो.येथील स्थानिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी तब्बल 15 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
विधानसभा मतदारसंघातील पंधरा विविध शाळांमध्ये त्यांनी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा पुरवल्या. या सुविधांमध्ये डिजिटल वर्ग खोल्यांचा समावेश आहे. दिवंगत हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला आणि या प्रकल्पाचे उद्घाटन 2024 साली करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications