अर्थसंकल्प २०२५: आत्तापर्यंत फक्त दोन महिलांनी मांडलाय अर्थसंकल्प; वाचा, कोण आहेत त्या दोन नेत्या
येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदा देशाचा ९३ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात एकूण ९२ अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ७७ अर्थसंकल्प हे सर्वसाधारण तर १५ अर्थसंकल्प हे अंतरिम अर्थसंकल्प होते. देशाच्या इतिहासात आत्तापर्यंत फक्त दोन महिलांनीच अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्या दोन महिला कोण, हेच आपण आज पाहूयात...

यंदाचा पूर्ण अर्थसंकल्प
उद्यापासून संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या वर्षी निवडणूक असल्याने पूर्ण अर्थसंकल्प मांडता आला नव्हता. आता निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प माडणार आहेत. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. त्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा महिला म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.
इंदिराजींकडे आहे पहिला मान
अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे आहे. इंदिरा गांधी या १९६९ मध्ये देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई होते. मात्र त्यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना पक्षाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे वित्तमंत्री हे पद रिक्त झाले. हे पद तीन महिने सांभाळल्यानंतर लगेच अर्थसंकल्प सादर करायचा होता. यावेळी अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार इंदिरा गांधी यांच्याकडेच होता. इंदिरा गांधी यांनी 28 फेब्रुवारी 1970 रोजी अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या महिला नेत्या ठरल्या.
दुसरा मान सीतारामन यांना
इंदिरा गांधी यांच्यानंतर सुमारे ५० वर्षे कोणत्याच महिला नेत्याला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली नाही. मोदी सरकारच्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर केला. 2019 पासून निर्मला सीतारामन यांनी दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याशिवाय निर्मला सीतारामन देशाच्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री देखील बनल्या. आता निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी 2025 ला आठव्यांदा अर्थसंकल्प मांडतील.












Click it and Unblock the Notifications