रिंकू सिंगचा धमाका! एकाच सामन्यात 14 दिग्गजांचा विक्रम मोडला; हा पराक्रम करणारा पहिला भारतीय
Rinku Singh Breaks Record : भारतीय क्रिकेटचा नवा 'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगने बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात बॅटने नव्हे, तर आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने इतिहास रचला आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात रिंकूने एकाच डावात चार अफलातून झेल टिपत भारतीय भूमीवर एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या कामगिरीसह त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या १४ दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

१४ खेळाडूंचा विक्रम मोडला!
भारतीय मैदानावर आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात ३ झेल घेण्याचा विक्रम १४ वेगवेगळ्या खेळाडूंनी १५ वेळा केला होता. यामध्ये हार्दिक पांड्या (२ वेळा), रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश होता. मात्र, रिंकू सिंगने एकाच सामन्यात ४ झेल घेत या सर्वांना मागे टाकले असून, भारतीय भूमीवर अशी कामगिरी करणारा तो पहिला 'नॉन-विकेटकीपर' खेळाडू ठरला आहे.
रिंकूने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स आणि जाकरी फॉल्क्स यांसारख्या स्फोटक फलंदाजांना तंबूत धाडण्यासाठी सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपले.
अजिंक्य रहाणेच्या पंगतीत स्थान
एका टी-२० सामन्यात ४ झेल घेणारा रिंकू सिंग हा केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध अजिंक्य रहाणेने अशी कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास, न्यूझीलंडविरुद्ध ४ झेल घेणारा तो जगातील दुसरा खेळाडू (पहिला पाकिस्तानचा सायम अयुब) ठरला आहे.
कोण आहे रिंकू सिंग? त्याची आतापर्यंतची कारकीर्द
रिंकू सिंग हा उत्तर प्रदेशातील अलीगढचा एक सामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याच्या यशाचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे.
जन्म आणि सुरुवात: १२ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्मलेल्या रिंकूने गरिबीवर मात करत क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली.
IPL मधून प्रसिद्धी: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या ५ चेंडूंवर ५ षटकार ठोकून तो रातोरात स्टार बनला.
भारतीय संघातील पदार्पण: ऑगस्ट २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध त्याने टी-२० पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय टी-२० संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे.
फिनिशरची भूमिका: रिंकूने कमी वेळात भारतासाठी अनेक सामन्यांत फिनिशरची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. तो केवळ फलंदाजीच नाही, तर मैदानावरील त्याच्या चपळ हालचाली आणि क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो.
हेही वाचा : एकाच दिवशी 2 हाय-व्होल्टेज मॅच! भारत-पाक क्रिकेट युद्धाचा दुर्मिळ योग; तारीख वेळ जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications