महाराष्ट्रासाठी काळिमा! प्रसूतीसाठी 6 KMची जंगलमय पायपीट; आधी बाळ दगावलं, मग मातेनेही सोडला प्राण
Gadchiroli news : एकीकडे आपण 'विकसित भारत' आणि 'डिजिटल महाराष्ट्र'च्या घोषणा देत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून समोर आलेली एक घटना माणुसकीला आणि सरकारी व्यवस्थेला लादणारी ठरली आहे. प्रसूतीसाठी रस्ता नसल्याने चक्क ६ किलोमीटर जंगलातून पायपीट करणाऱ्या एका २४ वर्षीय मातेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील या घटनेने महाराष्ट्राचे समाजमन सुन्न झाले आहे.
मृत्यूची ती '६ किलोमीटर' पायपीट
एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील रहिवासी आशा संतोष किरंगा (वय २४) या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. गावात ना धड रस्ता, ना आरोग्य सुविधा. ऐनवेळी प्रसववेदना सुरू झाल्या तर दवाखान्यात कसे पोहोचणार? या भयापोटी आशा यांनी १ जानेवारी रोजी आपल्या पतीसोबत ६ कि.मी. अंतरावर असलेल्या पेठा (बहिणीचे गाव) येथे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. नऊ महिन्यांचे ओझे पोटात घेऊन त्यांनी घनदाट जंगलातून पायी प्रवास केला, जो अखेर त्यांच्या मृत्यूचा प्रवास ठरला.

आधी बाळ दगावले, मग मातेचाही अंत
२ जानेवारीच्या मध्यरात्री आशा यांना तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना हेडरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैव असे की, तपासणीअंती डॉक्टरांनी बाळ पोटातच दगावल्याचे घोषित केले. बाळाच्या मृत्यूचा धक्का आणि वाढत्या रक्तदाबामुळे (Blood Pressure) आशा यांची प्रकृती वेगाने खालावली. काही वेळातच या मातेनेही अखेरचा श्वास घेतला.
मरणानंतरही वणवण: आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे
या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही या मातेच्या नशिबी असलेली फरफट थांबली नाही. शवविच्छेदनासाठी जे काही घडले ते आरोग्य यंत्रणेचे अपयश उघडे पाडणारे आहे. मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेला, पण तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हते. शेवटी मृतदेह पुन्हा ४० कि.मी. दूर असलेल्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलवावा लागला. शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर तब्बल २४ तासांहून अधिक काळानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळाला.
प्रश्न जो उत्तराच्या प्रतीक्षेत आहे...
गडचिरोलीत रस्ता नसल्याने रुग्णांना झोळीतून किंवा कावडीतून वाहून नेण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, २०२६ उजाडूनही जर एका गर्भवती महिलेला उपचारांसाठी जंगलातून पायी जावे लागत असेल, तर आपण खरंच प्रगत झालो आहोत का? "जिवंत असताना उपचार मिळाले नाहीत आणि मेल्यानंतरही मृतदेहाची विटंबना झाली. आमच्या भागातील आदिवासींचा जीव एवढा स्वस्त आहे का?" असा संतप्त सवाल मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा, दळणवळणाचे रस्ते आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. केवळ कागदावरच्या योजना आदिवासींच्या जीवाचे रक्षण करू शकत नाहीत, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.












Click it and Unblock the Notifications