ठाकरे गटाची मोठी संघटनात्मक बांधणी; ४० लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर
खासदारांच्या फुटीच्या धक्क्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि बूथ स्तरावर कार्यकर्त्यांशी थेट संवाद प्रस्थापित करणे हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश आहे.

या नव्या रचनेत पक्षाने मुंबईतील तरुण आमदार, नगरसेवक आणि आक्रमक पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर व माढा, तर वरुण सरदेसाई यांच्याकडे कल्याण व भिवंडी मतदारसंघाची धुरा देण्यात आली आहे. त्यासोबतच सचिन पडवळ (पुणे), सुनील शिंदे (अहिल्यानगर, शिर्डी), अरुण दुधवडकर (कोल्हापूर) आणि रवींद्र मिर्लेकर (नाशिक, दिंडोरी) यांसारख्या प्रमुख नेत्यांना विविध जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असतानाच, ठाकरे गटाने थेट मैदानात उतरून संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघांची जबाबदारी वाटून देऊन ठाकरे सेनेने आगामी राजकीय संघर्षासाठी पूर्ण तयारी दर्शवली आहे.


Click it and Unblock the Notifications
