संजय शिरसाट यांच्या रुपाने छत्रपती संभाजीनगरला मंत्रिपद! रिक्षाचालक ते मंत्री! वाचा राजकीय प्रवास
Sanjay Shirsat Age Biography : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घातलीच. गेल्यावेळी हुकलेले मंत्रिपद यंदा त्यांना मिळाले आहे. नागपूर येथे आयोजित विशेष समारंभात शिरसाट यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रीपद आणि गोपनियतेची शपथ दिली.
रिक्षाचालक ते तीनवेळा आमदार आणि आता मंत्री असा त्यांचा जीवनप्रवास आहे तर राजकीय प्रवास सर्वश्रूतच आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी रीक्षा चालवत असत. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशाच कष्टकरी आणि सामान्य तरुणांच्या घामावर आणि रक्तावर वाढली. या तरुणांनी आपल्या मेहनतीने आणि कष्टाने शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवला.

प्रस्थापिता विरोधातील या शिवसैनिकांची लढाई सोपी नव्हती. पण बाळासाहेबांच्या विचाराने भारलेल्या जिगरबाज शिवसैनिकांनी हा आपला लढा यशस्वी केला आणि प्रस्थापितांच्या पायाखालून सत्तेची जाजमे अक्षरशः खेचून आणली. अशा कष्टाळू तरुणांपैकी एक नाव म्हणजे आमदार संजय शिरसाट.
हेही वाचा : प्रतिक्षा संपली! भाजपकडून शपथविधीसाठी फोनकाॅल्स! आज नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी, 'हे' होणार मंत्री
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यानंतर शिवसेनेचा विस्तार केला तो मराठवाड्यात. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामुळे मराठवाडा धगधगत होता. प्रस्थापित पक्षांच्या प्रस्थापित नेतृत्वामुळे विस्थापित असलेल्या तरुणांचे जत्थेच्या जत्थे नव्या नेतृत्वाच्या शोधात होते. निखारे पेटत होते आणि त्याला फुंकर देण्याची गरज होती. ती फुंकर मारली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठवाड्यात त्यांनी झंझावाती दौरे केले.
हेही वाचा : थोडं थांबा, त्यांचेच लोक त्यांच्याच फाईल ओपन करतील; संजय राऊत यांचा महायुतीवर जोरदार निशाणा
शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आणि संपर्कप्रमुखांनी संपूर्ण मराठवाडा अक्षरशः ढवळून काढला. एक एक माणूस शोधला आणि त्याला संधी दिली. दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेचा प्रचंड विस्तार केला. बाळासाहेबांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी मराठवाडा गाजवून टाकला. शिवसेनेने मराठवाड्यात केलेली ती एक प्रचंड मोठी राजकीय घुसळण होती. आणि या घुसळणीतून कौटुंबिक पार्श्वभूमीचा चेहरा मोहरा नसलेले अनेक तरुण पुढे आले त्यातला एक तरुण म्हणजे संजय शिरसाट.
बाळासाहेबांचा विलक्षण प्रभाव
व्यवसायाने रिक्षा चालक असलेले संजय शिरसाट बाळासाहेबांच्या प्रभावामुळे शिवसेनेकडे खेचले गेले आणि त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. संभाजीनगर पश्चिम आणि बन्सीलाल नगर हा त्यांचा इलाका. बन्सीलाल नगर परिसरातून त्यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक पद भूषवले. ते सभागृह नेतेही झाले. शिवसेनेत विभागप्रमुख पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली होती. तेथून त्यांचा प्रवास आता मंत्रिपदापर्यंत पोहचला आहे.












Click it and Unblock the Notifications