मकर संक्रांतीला 'काळ्या' रंगाला महत्व का? जाणून घ्या शास्त्र; हलव्याचे दागिने कसे बनवतात वाचा पद्धती
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांत म्हणजे तीळ-गुळाचा गोडवा आणि पतंगांची आकाशी झेप! पण या सणाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी परिधान केलेली 'काळी' साडी आणि नववधू व लहान मुलांचे 'हलव्याचे दागिने'. इतर शुभ कार्यात वर्ज्य मानला जाणारा काळा रंग संक्रांतीलाच का महत्त्वाचा असतो आणि घरोघरी हलव्याचे दागिने कसे बनवले जातात, याविषयीचा हा खास रिपोर्ट.

संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व काय?
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जात असला, तरी मकर संक्रांतीला त्याला विशेष स्थान आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत.
उष्णता शोषून घेणारा रंग: मकर संक्रांत हा सण शिशिर ऋतूत येतो. या काळात प्रचंड थंडी असते. विज्ञान सांगते की, काळा रंग उष्णता सर्वाधिक शोषून घेतो. थंडीपासून शरीराचे रक्षण व्हावे आणि शरीरात ऊब टिकून राहावी, या उद्देशाने या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा पडली.
ऋतू बदलाचा सण: संक्रांतीनंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, ज्याला 'उत्तरायण' म्हणतात. थंडीच्या दिवसात शेवटचा काळ म्हणून या काळ्या रंगाचा वापर करून निसर्गाशी जुळवून घेण्याचा हा प्रयत्न असतो.
असे बनवा घरच्या घरी 'हलव्याचे दागिने'
संक्रांतीला नववधूचे 'लुटण' आणि लहान मुलांचे 'बोरन्हाण' केले जाते. यावेळी हलव्याचे दागिने घालण्याची हौस मोठी असते. हे दागिने बनवणे ही एक कला आहे.
साहित्य..
- पांढरा काटेरी हलवा (बाजारात मिळतो)
- कार्डबोर्ड किंवा जाड कागद
- फेविकॉल किंवा डिंकाचा वापर (खाद्य हलवा असल्याने काळजीपूर्वक)
- रंगीबेरंगी मणी, टिकल्या आणि गोल्डन दोरा (लेस)
कृती:
आराखडा तयार करा: सर्वात आधी कार्डबोर्डवर तुम्हाला हव्या असलेल्या दागिन्यांचा (हार, मंगळसूत्र, झुमके, मुकुट, वाकी) आकार कापून घ्या.
बेस तयार करा: कापलेल्या आकारावर सुती कापड किंवा सोनेरी कागद चिकटवा, ज्यामुळे दागिना आकर्षक दिसेल.
हलवा चिकटवा: आता फेविकॉलच्या सहाय्याने एक-एक हलव्याचा दाणा कार्डबोर्डवर नीट रांगेत चिकटवा. दोन हलव्यांच्या मध्ये मणी किंवा टिकल्या लावून नक्षीकाम करा.
दोरा जोडा: दागिने घालण्यासाठी पाठीमागच्या बाजूला सिल्कचा दोरा किंवा रिबीन जोडा.
वाळू द्या: चिकटवल्यानंतर हे दागिने २-३ तास नीट वाळू द्या, जेणेकरून हलवा निसटणार नाही.
हेही वाचा : Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला? जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहुर्त












Click it and Unblock the Notifications