Bharatshet Gogawale Biography:शेतकऱ्यांचा मुलगा झाला मंत्री! भरतशेठ गोगावलेंनी घेतली शपथ,कोणते खाते?
Bharatshet Gogawale Biography : भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अखेरीस भरत शेठ गोगावले यांची मंत्री म्हणून वर्णी लागली. गेल्या अनेक दिवसांपासून ते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. प्रत्येक वेळी हुकणाऱ्या मंत्रीपदावरून विरोधक त्यांची सातत्याने खिल्ली उडवत असत. मात्र आज त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे.
साध्या शेतकऱ्याचा मुलगा आणि तळागाळात संघर्ष करणारा कार्यकर्ता ते आमदार अशी गोगावले यांची वाटचाल आहे. गेल्या तीन टर्म पासून भरत शेठ रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तळागाळात असलेला संपर्क, रांगडी भाषा, थेट आणि बिनधास्त स्वभाव आणि सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती तसेच सहज संपर्क यामुळे भरतशेठ मतदार संघात प्रचंड लोकप्रिय आहेत.

त्यांच्या निवासस्थानी सामान्य जनतेचा प्रचंड राबता असतो. मतदार संघात कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडतो. महाड तालुक्यातून मुंबई वास्तव्यासाठी असलेल्या लोकांशीही त्यांचा थेट कनेक्ट आहे. विशेषतः उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणारे रुग्णांच्या मदतीसाठी भरतशेठ नेहमी तत्पर असतात.
एकनाथ शिंदे यांना साथ
महाड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तीनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती मोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात भरत शेठ भोगावले यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती पण महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या गर्दीत भरत शेठ यांना संधी मिळाली नाही. 2022 आली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले आणि शिवसेनेसह सरकारही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आले. पक्षाची अधिकृत निशाणी देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासून साथ देणारा आमदार म्हणजे भरत शेठ गोगावले होय.
मंत्रीपदाची पुन्हा हुलकावणी
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तरी भरत शेठ यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत होते पण भरत शेठ पक्षाचे प्रतोद झाले. मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी यांनी फारशी कधी व्यक्त केली नाही. पक्षाचे आणि संघटनेचे काम त्यांनी सुरूच ठेवले. एकनाथ शिंदे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गोगावले यांना महाड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी उबाठा गटाच्या स्नेहल जगताप यांचा २७ हजार मतांनी पराभव केला.
हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदावरुन दोन आमदार आमनेसामने?, वाचा- काय म्हणाले गोगावले अन् शिरसाट
एमआयडीसीमध्ये सुविधांवर भर
महाड विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये भरत शेठ गोगावले यांनी पायाभूत सुविधा विकासाची अनेक कामे पूर्ण करून घेतली.. विशेषतः एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी अधिक भर दिला तसेच नव्या कंपन्यांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली. या कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला, पेप्सीको, सुदर्शन केमिकल्स, पिरामल फार्मा तसेच अन्य नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील आणि महाड परिसरातील असंख्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .
रायगड परिसरात विकासकामे
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा किल्ला उभारला. रायगड किल्ला प्राधिकरणच्या माध्यमातून किल्ला परिसरात भरत गोगावले यांनी अनेक कामे करून घेतली त्यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. महाडहून रायगडला जाणाऱ्या रस्त्याचे भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. 2022 - 23 या वर्षात भरत शेठ गोगावले यांचे नेतृत्वाखाली सावित्री नदीपात्राची स्वच्छता आणि गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून सावित्री नदीचे पात्र खोल झाले आहे आणि त्यामुळेच येथील नागरिकांमध्ये पुरापासून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.












Click it and Unblock the Notifications