शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदावरुन दोन आमदार आमनेसामने?, वाचा- काय म्हणाले गोगावले अन् शिरसाट
MLA Sanjay Shirsat vs MLA Bharat Gogawle : मला मंत्रिपद मिळत असताना एका आमदाराने राजीनामा देण्याची धमकी दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. आता हा रोख नेमका कोणाकडे यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. दुसरीकडे गोगावले यांचा थेट रोख हा आमदार संजय शिरसाटांवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यामुळे मंत्रिपदावरुन शिवसेनेतील दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद समोर आला आहे.
काय म्हणाले होते भरत गोगावले?
आमदार बालाजी किणीकर यांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना भरत गोगावले म्हणाले, मला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारले की शेठ काय करायचे? तेव्हा एकजण म्हणाला, तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली की मी 12 वाजता राजीनामा देतो. म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना सिडकोचे अध्यक्ष केले. दरम्यान, आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. एकजण म्हणाला मला मंत्रिपद नाही भेटले तर माझी बायको आत्महत्या करेल. त्याला बोललो आमच्या बायकांनी काय करायचे?, असाही प्रसंग त्यांनी सांगितला. त्यामुळे भरत गोगावले यांचा हा रोख संजय शिरसाठ यांच्याकडेच होता का?, हे अगदी स्पष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राजीनामा देणार होतो, पण..गोगावलेंचा संबंध..
आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यावर आमदार संजय शिरसाठ यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो, का, कशासाठी, काय घडले यात मी जाणार नाही. मात्र माझ्यामुळे भरत गोगावले नाराज नाहीत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, सिडकोचे अध्यक्षपद भरत गोगावले यांनी मागितले नव्हते, एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देखील मागितले नव्हते, मी देखील सिडकोचे अध्यक्षपद मागितले नव्हते, हे सत्य आहे. गोगावले नाराज आहे किंवा मी नाराज आहे असे नाही, आम्हाला शिंदे साहेबांवर विश्वास आहे, असा विश्वास शिरसाट यांनी केला.
भरत गोगावले एसटी महामंडळ अध्यक्षपदी
आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. भरत गोगावले मंत्रिपदासाठी दीर्घ काळापासून प्रतीक्षेत होते. कोट शिवून तयार आहे, हे त्यांचे वाक्य देखील चर्चेत आले होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराजही होते. मात्र आता कॅबिनेटचा दर्जा असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदावर गोगावले यांची वर्णी लागली आहे.












Click it and Unblock the Notifications