पाकिस्तान हादरलं! इस्लामाबादमध्ये नमाज दरम्यान आत्मघाती स्फोट; 31 जणांचा मृत्यू, शहरात आणीबाणी घोषित
Pakistan News Islamabad Blast Today Suicide Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. शुक्रवारी 'जुम्मा'च्या नमाज दरम्यान तरलाई भागातील 'इमाम बारगाह खदिजत-उल-कुब्रा' येथे एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. 'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, या भीषण स्फोटात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रार्थनेवेळी रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, नमाजसाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा हल्ला झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की संपूर्ण परिसर हादरून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सुनियोजित आत्मघाती हल्ला (Suicide Blast) होता.
राजधानीत हाय अलर्ट आणि आणीबाणी
या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने संपूर्ण इस्लामाबादमध्ये आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.
शहर सील: इस्लामाबादचे सर्व प्रवेश आणि निकास द्वार सील करण्यात आले असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हॉस्पिटल्समध्ये रेड अलर्ट: जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णालयांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना तातडीने कामावर बोलावण्यात आले आहे.
इंटरनेटवर बंदी: अफवा पसरू नयेत यासाठी शहरातील काही भागांतील मोबाईल आणि इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे.
तीन महिन्यात दुसरा मोठा हल्ला
इस्लामाबादमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जी-११ भागातील कोर्टाबाहेर असाच एक आत्मघाती स्फोट झाला होता, ज्यात १२ जणांचा बळी गेला होता. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानची राजधानी आता 'हाय-रिस्क झोन'मध्ये बदलली आहे.
हेही वाचा : जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची नवी यादी जाहीर; पाकिस्तान इथेही मागे, भारत कितव्या स्थानी? वाचा
हेही वाचा : युद्धाच्या सावलीत चर्चेची आशा! अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने; ओमानमध्ये रंगणार मुत्सद्देगिरीचा थरार












Click it and Unblock the Notifications